मेढा आगारात प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू : नीता बाबर
राज्य परिवहनच्या प्रवास व्यवस्थेत डिजिटल बदल

कार्ड काढण्यासाठी महिलांसह जेष्ठांची प्रचंड गर्दी
कुडाळ | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवास व्यवस्थेत मोठा डिजिटल बदल होत असून आता प्रवाशांना तिकिटाऐवजी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरता येणार आहे. रोख व्यवहार कमी करून प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी ही योजना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लागू केली असून मेढा आगारामध्ये स्मार्ट कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला असल्याची माहिती मेढा आगाराच्या व्यवस्थापक नीता बाबर यांनी दिली आहे. तसेच योजनेचा शुभारंभ करताच ग्रामिण भागातील महिलांचा कार्ड काढण्यासाठी उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
एस. टी. महामंडळाने पारंपरिक तिकीट पद्धतीला पर्याय देत एन. सी. एम. सी. प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्डद्वारे प्रवाशांना सवलतींची अचूक नोंद, रोखविरहित व्यवहार आणि प्रतिपूर्तीची स्पष्ट प्रक्रिया एकाच माध्यमातून मिळणार आहे. विविध सामाजिक सवलती घेण्यासाठी भविष्यात हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार असल्याचेही नीता बाबर यांनी स्पष्ट केले. त्यानुसार मेढा एस.टी. आगारांमध्ये कार्ड नोंदणी मोहीम सुरू झाली असून त्यासाठी प्रवाशांना बसस्थानकावर अर्ज करता येणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना व्यवस्थापक बाबर म्हणाल्या, या स्मार्ट कार्डचा लाभ विविध प्रवासी गटांना देण्यात येणार आहे. शालेय आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरल क्रमांकाशी जोडलेले कार्ड मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना आधार संलग्र कार्ड दिले जाणार आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी युडीआयडी क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले मेढा बसस्थानकात कार्ड उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा : जम्मू-काश्मीरचा ऐतिहासिक विजय; पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं
अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयांमार्फत कार्ड वितरित केले जाणार आहेत. कार्डची किंमत नवीन कार्डसाठी १९९ रुपये असून जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत कार्ड मिळेल. किमान १०० रुपये वॉलेट बॅलन्स आवश्यक असेल आणि ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येईल तसेच ईटीआयएम मशीन, अधिकृत सातारा विभागचे संकेतस्थळ, मोबाइल अॅप किंवा नियुक्त एजंटकडून रिचार्जची सुविधा असेल. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी बसस्थानकांवरच नोंदणीची सोय करण्यात आली आहे.
मेढा (जावली) बसस्थानकामध्ये स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात झाली असून महिला, ६५ वर्षावरील नागरिक, ७५ वर्षावरील नागरिक यांनी मेढा बसस्थानकामध्ये येवून आपले कार्ड काढून घ्यावे असे आवाहन मेढा आगाराच्या आगार प्रमुख नीता बाबर यांनी केले आहे.




