अपघात प्रवण क्षेत्रात सिग्नलची मात्रा, उपायांसाठी खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण
![Signal volume in accident prone areas, survey by private organization for solutions](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/nashik-signal-780x470.jpg)
नाशिक महानगरपालिका शहरात बंद असलेले सात सिग्नल कार्यान्वित करण्यासह २२ ठिकाणी नवीन सिग्नल उभारणार आहे. यात प्रथम अपघातप्रवण क्षेत्रास प्राधान्य देऊन दुसऱ्या टप्प्यात गर्दीच्या ठिकाणी ती व्यवस्था केली जाईल. शिवाय या क्षेत्रात कॅमेरे बसवून लक्ष दिले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने औरंगाबाद रस्त्यावरील कैलासनगर (मिरची चौक), नांदुरनाका आणि सिध्दीविनायक चौक अशा तीन ठिकाणी उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव शासनास पाठविला आहे. खासगी कंपनीकडून अपघातप्रवण क्षेत्राचे सर्वेक्षण केले जाणार असून प्रत्येक ठिकाणी कोणते उपाय गरजेचे आहेत, याचा अहवाल १५ दिवसात सादर केला जाणार आहे.
महानगरपालिकेत रस्ता सुरक्षा समितीची बैठक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या उपस्थितीत पार पडली. औरंगाबाद रस्त्यावरील भीषण अपघातानंतर २३ अपघातप्रवण क्षेत्रासह अन्य भागातील अपघात टाळण्याच्या उपाययोजनांवर विचार विनिमय झाला. जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या काळात भरधाव वाहने चालविल्याने १८६ अपघात झाले. त्यात ६० जणांचा मृत्यू झाला. हेल्मेटविना वाहन चालविणाऱ्यांचे ८५ अपघात होऊन ४८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. शहरातून ७० किलोमीटरचे महामार्ग जातात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची भूमिका महत्वाची आहे. नाशिकच्या ५० वाहतूक पोलिसांना मुंबईत प्रशिक्षण दिले जाणार आहे. वाहतूक विभागासाठी एक स्वतंत्र पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती व महामार्गावर गस्तीसाठी १६ विशेष जीप आणि १६ मोटारसायकलची आवश्यकता असल्याकडे नाईकनवरे यांनी लक्ष वेधले. अपघातप्रवण क्षेत्राचे खासगी कंपनी सर्वेक्षण करीत असून १५ दिवसांत कुठल्या ठिकाणी काय उपाययोजना कराव्या लागतील, याचा अहवाल दिला जाणार आहे. बैठकीस प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, बांधकाम विभागाचे अविनाश देवरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गर्दीची ६७ ठिकाणे
प्रथम अपघातप्रवण क्षेत्रात आणि नंतर गर्दीच्या ठिकाणी सिग्नल उभारले जातील, अशी ग्वाही मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिली. त्या ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे नियोजन आहे. शहरातील काही भागात गर्दी असते. अशी ठिकाणे मनपाने धुंडाळली असून यात नाशिक रोड विभागात ११, पंचवटी आणि सातपूर प्रत्येकी १०, नवीन नाशिक सात, पूर्व १४ आणि पश्चिम विभागात १५ ठिकाणांचा समावेश आहे.
मुंबई नाका चौकाचा घेर कमी करा
मुंबई नाका चौकात प्रचंड वाहतूक कोंडी असते. या चौकातील वेगवेगळ्या वेळी वाहतुकीची वेगळी स्थिती असते. अशी माहिती चित्रफितीतून बैठकीत सादर झाली. मुंबई नाका चौकाची व्याप्ती कमी करून मार्गिका विस्तारण्याची सूचना पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी केली. या ठिकाणी भुयारी मार्गाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.