सातारा जिल्हा परिषद सभेत रस्त्यांच्या कामावरून जुंपली
![सातारा जिल्हा परिषद सभेत रस्त्यांच्या कामावरून जुंपली](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/Traffic_Safety_64.jpg)
कराड |
सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी मंडळाचा कार्यकाळ संपणे दृष्टिपथात असताना अखेरच्या आणि ऑनलाईन सर्वसाधारण सभेत रस्त्यांच्या कामावरून चांगलीच जुंपली. ऑनलाईन सभा घेतल्याने अनेक सदस्यांनी नाराजीही व्यक्त केली. त्यामुळे आता अध्यक्षांनी अंदाजपत्रकीय सभा ऑफलाईन घेण्याला हिरवा कंदील दाखवला. अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखालील या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ यांच्यासह पदाधिकारी मंडळ व प्रशासन सहभागी होते. दत्ता अनपट यांनी ही सभा चुकीच्या पद्धतीने होत असून, ती ऑफलाईन व्हायला पाहिजे होती असे म्हणणे मांडले. या वेळी वसंतराव मानकुमरे यांनीही सभा ऑनलाईन घेतल्याबद्दल नापसंती व्यक्त केली. ऑनलाईन सभा घेण्याचे कारण काय, असा प्रश्न केला असता अध्यक्षांनी अंदाजपत्रकीय सभा ऑनलाईन नव्हे,तर ऑफलाईन घेण्यास अनुकूलता दर्शवली.
विजय पवार यांनी, गेल्यावर्षी अतिवृष्टीत तालुक्यातील रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ५० कोटींचा निधी आणला आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे विनाविलंब पूर्ण व्हावीत अशी मागणी केली. यावर बापूराव जाधव यांनी हरकत घेत ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याचे कारण काय, असा सवाल केल्याने पवार आणि जाधव यांच्यात चांगलीच जुंपली. यावर रस्त्याची ३० लाखांपर्यंतची कामे जिल्हा परिषदेमार्फत, तर त्याहून अधिक रकमेची कामे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जातील, असे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी सांगितले. माण पंचायत समिती इमारत निर्लेखनबाबत अरुण गोरे यांनी ‘इमारत पडल्यावर निधी देणार का?’ असा प्रश्न उपस्थित केला. अंगणवाडीतील मुलांसाठी नळपाणी व्यवस्था नसल्याचा मुद्दा अर्चना देशमुख यांनी उपस्थित केला.