ताज्या घडामोडीसातारा

साताऱ्याच्या दोन गावांची अजब प्रथा, महिला समारोसमोर, एकमेकांना प्रचंड शिवीगाळ

सुखेड आणि बोरी दोन गावात नागपंचमीचा दुसऱ्या दिवशी अनोखी प्रथा साजरी

सातारा : राज्यात अनेक भागात खूप वेगळ्या आणि अनोख्या प्रथा आहेत. मात्र अशीच एक शिव्या देण्याची अनोखी प्रथा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात सुखेड आणि बोरी या दोन गावात नागपंचमीचा दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून सुखेड आणि बोरी या दोन गावातील महिला दोन्ही गावच्या वेशीवर असणाऱ्या एका ओढ्याच्या ठिकाणी येवून एकमेकांना जोर जोरात हात हलवत शिव्या देतात. या शिव्या खूप वेगळ्या प्रकारच्या असतात. या शिव्या कोणाला ऐकू येवू नये यासाठी यावेळी पारंपारिक वाद्य वाजवली जातात.

या दोन गावातील 2 महिलांची एक जुनी कथा आहे. बोरी आणि सुखेड गावच्या दोन महिला या ओढ्यावर भांडणे होवून त्यात त्या मरण पावल्यामुळे ही प्रथा सुरु झाली, अशी आख्यायिका आहे. त्यानुसार आज सुद्धा ही प्रथा अशीच सुरु आहे आणि ही प्रथा पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक भागातून लोक या ठिकाणी येत असतात. ही प्रथा जर आम्ही पाळली नाही तर गावावर रोगराई पसरते, अशी या महिलांची धारणा आहे.

या गावातील महिलांच्या मुली सुद्धा या अनोख्या प्रथेत सहभागी होऊन ही प्रथा अखंड सुरु ठेवण्याचे काम करत आहेत. या दोन गावातील महिला एकमेकांना जोरजोरात हात हलवत शिव्या देतात. यावेळी या ओढ्याच्या मध्यभागी महिलांना थोपवण्यासाठी महिला पोलीस आणि ग्रामस्थांची व्यवस्था केली जाते. मात्र महिलांचा जमाव मोठा असल्याने त्यांना पांगविण्यासाठी पोलीस प्रशासनाची चांगलीच यावेळी तारांबळ उडते.

अनेक वर्षापासून ही परंपरा असल्यामुळे नागपंचमीचा दुसरा दिवस हा दोन्ही गावातील महिला हा एकमेकींना शिवीगाळ करुन साजरा करतात. मात्र इतर वेळी दोन्ही गावे एकत्र येऊन आपली नाती जपतात. दरम्यान, या प्रथेची राज्यभरात चर्चा होत आहे. दोन्ही गावांच्या महिला समोरासमोर येऊन शिव्यांची लाखोली वाहतात हे पाहण्यासाठी खूप लांबून नागरिक येत असतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button