राजकारणामध्ये एकमत कमी, अत्यंत टोकाचे मतभेद जास्त!

मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावर सध्यातरी ठाकरे बंधू यांचे ऐक्य झाले आहे आणि महाराष्ट्रातील टीव्ही वाहिन्यांवर प्रचंड चर्चा देखील घडवून आणण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिक मात्र चांगला संभ्रमात पडला आहे. कारण, टीव्हीवाले दोन्ही बाजूने ढोल बडवत असतात, आणि सर्वसामान्यांच्या मेंदूचा अक्षरश: खिमा होतो.
परिस्थिती सत्य आहे का राजकारण?
हे सर्व काही खरे असले तरी, बरेच प्रश्न समोर उभे राहतात. त्यामध्ये बऱ्याच वेळा वाटते की हे सर्व चालू आहे ते खरोखर भाषेच्या प्रेमापोटी आहे की नुसते राजकारण खेळणे सुरू आहे ! राजकारणात एकमत कमी आणि मतभेद अधिक असतात, हे सर्वांनाच माहीत आहे. येथे मतभेद आहेत, असे म्हणणे योग्य नाही. पण, प्रचाराची दिशा काय असू शकते, हा चर्चेचा विषय!
प्रवक्ते कंपनीला मोलाचा सल्ला..
म्हणजे बघा, राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रवक्ते कंपनीला काही बोलण्याआधी चर्चा करा, असे सांगितले आहे. म्हणजे मायलेज आपोआप घटले. तसे संदीप देशपांडे बोलत होते, पण तेही गप्प झाले.. बाळा नांदगावकर बरेच शांत झाले आहेत आणि लीडर पार्टी असते तेव्हा संघटनात्मक बाब फारशी महत्त्वाची ठरत नाही. त्यामुळे राज ठाकरे सभा वगैरे घेतील तेव्हा पक्षाची भूमिका पुढे येईल. तो योग येईल तेव्हा खरे. दुसरे म्हणजे अन्य राज्यातील भाजपाच्या काही नेत्यांनी आगाऊपणा करुन वक्तव्ये केली तरी त्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. आपल्या वाहिन्यांवर भाजपाचे खासदार दुबे वगैरे बरळले, अशा बातम्या येतात. पण दक्षिणेतील राज्यांमध्ये स्थानिक वाहिन्या जशा आक्रमक आहेत, तशा मराठी वाहिन्या नाहीत. याचे कारण नेमकी बातमी काय याचे भान अनेक वार्ताहरांना किंवा संपादकांना नाही, ही वस्तुस्थिती आहे.
‘सामना’ नक्की कोणाचे मुखपत्र?
उबाठा गटाकडून संजय राऊत यांच्या भपाऱ्या सुरु असतातच. पण ‘सामना’ हे उबाठा गटाचे कमी आणि संजय राऊत यांच्या मालकीचे अधिक असे वर्तमानपत्र झाले आहे. तेथे बंधूंचे ऐक्य वगैरे बाजूला राहून त्यांना तोंडावर पाडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात असलेला राग सतत व्यक्त होत असतो. मिंधे, बेईमान वगैरे लाखोल्या इतक्या पुरातन झाल्या आहेत, की लोकांना त्याचा कधीच विसर पडला आहे आणि शिंदे यांनी पाठीत खंजीर खुपसला वगैरे प्रचार मनसे आणि राज ठाकरे कशासाठी करतील ? म्हणजे प्रचाराचे एकच सूत्र नाही हा पहिला मुद्दा..
फक्त मुंबई महापालिकेपुरते नाही ना!
दुसरे म्हणजे हे ऐक्य मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी आहे किंवा कसे हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा. तशी भाजपाची एकंदर व्यूहरचना बघितली, तर तिकडे हैदराबादमध्ये जाऊन तिथे महानगरपालिका निवडणूक भाजपाने लोकसभेची निवडणूक लढवावी, तशी लढवली होती, हे लक्षात घ्यायला हवे. मुंबई जिंकायचीच असेल तर भाजपा ची त्यासाठी तयारी सुरु झालेली असेलच आणि राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले आहेत. एकनाथ शिंदे यांना देखील ते भेटतात. पुढे भेटणार नाहीत, असे देखील नाही. त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका नेहमीप्रमाणे संभ्रमावस्थेत टाकणारी आहे. उबाठा गटाने त्यांना ग्राह्य धरू नये, असे संकेत त्यांनी पूर्वीच दिले आहेत.
दोन दिवसात हवा संपली, पुढे काय?
..आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाच तारखेला मोठी सभा झाली. इव्हेंट वगैरे झाला. वगळे, बगळे प्रसन्न होऊन आता ‘महायुती’ च्या समोर आव्हान वगैरे बोलत राहिले. पण, ती हवा दोन दिवसांत संपली आणि महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत मुंबई महानगरपालिका म्हणजे शिवसेना असे समीकरण होते. ती सगळी अखंड शिवसेना होती.२०१७ च्या निवडणुकीत शिवसेना अखंड असूनही एकट्याने बहुमतात नव्हती. पुढे मनसेचे नगरसेवक फुटले होते आणि भाजपला चांगल्या जागा मिळूनही सत्ता शिवसेनेच्या ताब्यात देण्यात आली होती, हे लक्षात घ्यायला हवे! त्या निवडणुकीत शिवसेनेचे ८६ नगरसेवक तर भाजपाचे ८३ नगरसेवक निवडून आले होते. पण, युतीमध्ये आनंदाचे वातावरण असल्यामुळे शिवसेनेला भाजपाने ‘बाय’ दिला होता.
हेही वाचा : शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
शिवसेना दुभंगली त्याचे काय ?
पूर्वी एक गठ्ठा असलेली शिवसेना मधील काळात दुभंगली असून मोठा गट वेगळा झाला आहे. त्यालाच अधिकृत शिवसेना हा दर्जा देण्यात आला असून शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह हे मिळाले आहे. त्यामुळे उबाठा गटाची आता युती मनसे बरोबर होणार असली तरी पक्ष वेगळा आहे. निवडणुकीत जागावाटप योग्य झाले, तर मराठा पट्ट्यात चांगले म्हणता येईल, असे यश मिळू शकते. पण एकनाथ शिंदे यांची शिवसेना मते घेणार आहेच ना ! शिवाय भाजपाला मानणारा मराठी माणूस काहीच की, त्याचे काय ?
नकारात्मक प्रचार आवडेल का?
या सर्व पार्श्वभूमीवर आता सर्वात महत्वाचे म्हणजे उबाठा चा प्रचार नकारात्मक अधिक आहे. शिंदे यांनी आमचा पक्ष फोडला, आमचा बाप चोरला आमचे सर्वस्व नेले, आता महाराष्ट्राने, विशेषतः मराठी माणसाने आम्हाला न्याय द्यावा ही उबाठा ची मागणी आहे. पण, मनसे किंवा राज ठाकरे ही मागणी कशासाठी करतील ? सत्ता मिळणे किंवा न मिळणे हा भाग वेगळा, पण गरजेतून निर्माण झालेली भागीदारी तशी नैसर्गिक असत नाही. मराठी माणसाला भावांनी साद घातली असली तरी निवडलेली वेळ आणि हिंदी भाषेच्या कथित सक्तिचा विषय फारसा मनाला लावून घेण्याची परिस्थिती नक्कीच नाही.
मुख्यमंत्र्यांचा डोकेबाज डाव..
मुख्यमंत्र्यांनी एक डोकेबाज डाव टाकून वातावरण जास्त पेटण्यापूर्वीच हिंदीसक्ती मागे घेतली आणि ती कुणामुळे घेतली, तरीही त्याचा दीर्घकाळ प्रभाव पडून ठाकरे बंधूंच्या मतपेट्या भरतील, ही शक्यता बरीच कमी आहे. त्यामुळे यापुढे ठाकरे बंधू जे जे डाव टाकतील त्याला सडेतोडपणे उत्तर देण्यास ‘महायुती’ सज्ज आहे. काही प्रमाणात भाजपाकडून आणि उरलेली उत्तरे शिवसेनेकडून दिली जातील, हे मराठी माणसाला नक्कीच पटेल.
मूळ भूमिकेतच लोच्या..
अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे दोघेही भाऊ वेगवेगळ्या सभा घेऊन प्रचार करु शकत असताना आता एकत्र सभा घेणार की कसे, हा देखील मोठा विषय. आपल्या नेत्याची सभा गाजावी म्हणून दोघांचे समर्थक प्रयत्न करतील हा एक लाभ आहेच, पण, दोघांची तुलना करण्याचा मोह पत्रकार मंडळींना होणारच की.. तेथे धाकटा पडला भारी असे निष्कर्ष निघाले, की गंमत होऊ शकते. आता आणखी एक लोच्या म्हणजे मनसे ला म्हणजे राज ठाकरे यांना ‘सामना’ कितपत प्रसिद्धी देणार ? भुजबळ यांना लखोबा संबोधून त्यांना हैराण केले होते. राणे यांना तसेच हैराण करण्याचा प्रयत्न होतो, आता शिंदे यांना मिंधे, गद्दार वगैरे संबोधने लावली गेली आहेतच. पण,ती राज ठाकरे लावणार नाहीत. परिणामी एकाच उत्पादनाची वेगवेगळी जाहिरात करण्यासारखे होईल ही शक्यता नाकारता येत नाही !
मराठी माणूस भरडला जाऊ नये..
त्यामुळेच असे म्हणता येते की एकमत होण्याची शक्यता कमी असते, आणि मतभेद होण्यासाठी अनेक वेगवेगळे डावपेच राजकारणात सक्रिय असतात. या सर्व राजकीय खेळामध्ये मराठी माणूस मात्र भरडला जाऊ नये, एवढी प्रार्थना करणे मात्र आपल्या हातात आहे. बघू या आता घोडा मैदान जवळच आलेले आहे.