पंतप्रधान मोदींचा ऐतिहासिक दौरा ! या पाच देशांसोबत संबंध दृढ करण्याचा संकल्प

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझिल आणि नामिबिया या पाच देशांच्या दौऱ्यासाठी आज रवाना झाले. त्यांच्या या ८ दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात घाना येथून होणार आहे. घानाचे अध्यक्ष जॉन द्रामनी महामा यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान घानाला रवाना झाले. घाना आफ्रिकन महासंघ तसेच पश्चिम आफ्रिकी राष्ट्रांचा आर्थिक समुदाय यामध्ये महत्वाची भूमिका निभावतो.
उभय देशांमधील ऐतिहासिक बंध आणखी दृढ करण्यासाठी आणि गुंतवणूक, उर्जा, आरोग्य, सुरक्षा, क्षमता निर्मिती तसेच विकासविषयक भागीदारी या क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दालने खुली करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी दौऱ्याला रवाना होण्यापुर्वी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या दौऱ्यात ते घानाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत.
हेही वाचा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरीतील सुविधांची पाहणी करणार
घानामधल्या भारतीय समुदायात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान उद्या त्रिनिदाद टोबॅगोसाठी रवाना होतील. तिथे ते त्रिनिदादच्या अध्यक्षा क्रिस्टिन कार्ला कांगालू आणि पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतील. त्यानंतर पंतप्रधान अर्जेंटिनाला जाणार असून गेल्या ५७ वर्षांतला भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला अर्जेंटीना दौरा आहे. अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर माईल यांच्याशी मोदी चर्चा करणार असून त्यात शेती, महत्त्वाची खनिजं, ऊर्जा, व्यापार, पर्यटन, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक क्षेत्रांसह परस्पर सहकार्याचा समावेश आहे.
त्यानंतर पंतप्रधान ब्राझील इथे येत्या ६ आणि ७ जुलैला रिओ दी जिनेरो इथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहतील. शिखर परिषदेत ते अनेक जागतिक नेत्यांना भेटणार आहेत. गेल्या सहा दशकातला भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच ब्राझील दौरा आहे. ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्याबरोबर ते चर्चा करतील. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नामिबियाला भेट देणार आहेत. तिथे ते नामिबियाचे अध्यक्ष डॉक्टर नेतुम्बो नंदी नदैतवाह यांची भेट घेतील