PM Modi Independence Day: कोरोनाच्या तीन लसी विविध टप्प्यात, लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांकडून खुशखबर, नरेंद्र मोदींचा पुन्हा ‘आत्मनिर्भर भारता’चा नारा
नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ल्यावर 74 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेले आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताचा नारा दिला. देशात कोरोनाच्या तीन लसी विविध टप्प्यात असून वैज्ञानिकांनी हिरवा कंदील दाखवताच वेगाने प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याची रूपरेखा तयार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिलेली आहे. भारताकडे ज्याने वाकडी नजर करुन पाहिले, त्यांना सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. तर नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनची आजपासून सुरुवात झाल्याची घोषणाही मोदींनी केलेली आहे. पायाभूत सुविधांसाठी 110 लाख कोटीपेक्षा अधिक खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. देश 75 व्या वर्षाच्या दिशेने जात असताना आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. फक्त आयातीवर बंदी घालणं आपला उद्देश नसून निर्यातक्षमही व्हायचं आहे असे म्हणत मोदींनी पुन्हा ‘व्होकल फॉर लोकल’ होण्यास सांगितलेले आहे.