पेट्रोल-डिझेल दरवाढ सुरूच ! जाणून घ्या आजचे दर
![A big reduction in petrol-diesel prices on the day of Lakshmi Puja](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Petrol-1-1-2.jpg)
नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचा दर प्रतिबॅरल 86 डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. तो आता 85 डॉलर्सच्या खाली आला आहे. त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडूनअद्याप इंधनदरात कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या चिंतेत सतत महागणारे पेट्रोल-डिझेलचे दर भर घालत आहेत. आज देशात डिझेलचे दर 34 ते 38 पैशांनी आणि पेट्रोलचे दर 30 ते 35 पैशांनी वाढले आहेत. यासह दिल्लीत पेट्रोलचा दर 107.59 रुपये आणि डिझेलचा दर 96.32 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे, तर देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईत पेट्रोलची किंमत 113.46 रुपये आणि डिझेलची किंमत 104.38 रुपये प्रतिलिटर आहे. तसेच कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 108.11 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 99.43 रुपये प्रतिलिटर असून चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 104.52 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 100.59 रुपये प्रतिलिटर आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज सकाळी 6 वाजता बदल होत असतो. सकाळी 6 वाजता नवे दर लागू केले जातात.