‘खान सर’ यांना मोठा दिलासा! पाटणा न्यायालयाकडून अटकेला स्थगिती

Khan Sir Patna Court Case | प्रसिद्ध शिक्षक आणि युट्युबर फैसल खान उर्फ ‘खान सर’ यांना पाटणा जिल्हा न्यायालयाने आज, मंगळवारी मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने खान सर यांच्या अटकेला तात्पुरती स्थगिती दिली असून पुढील आदेश येईपर्यंत किंवा पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई करू नये, असा निर्णय दिला आहे. हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खान सरांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती, ज्यावर आज सुनावणी पार पडली.
नेमका काय आहे आरोप?
पाटण्यातील मुसल्लहपूर भागात खान सरांचे ‘खान ग्लोबल स्टडीज’ (KGS) हे नामांकित कोचिंग सेंटर आहे. २ जूनच्या रात्री या कोचिंग सेंटरबाहेर जोरदार हिंंसाचार झाला होता. या हिंसाचारादरम्यान खान सरांनी आपल्या सुरक्षारक्षकांना गर्दीवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते आणि “जे काही होईल ते मी पाहून घेईन,” असे चिथावणीखोर वक्तव्य केले होते, असा दावा त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी तपास अधिकाऱ्यांसमोर केला आहे.
या दाव्यानंतर ४ जून रोजी खान सर, त्यांचे दोन सुरक्षारक्षक आणि इतर काही जणांविरोधात हत्येचा प्रयत्न करणे आणि आर्म्स अॅक्टच्या विविध कलमांखाली भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला होता.
हेही वाचा
अण्णासाहेब मगर बँकेला ‘भारतरत्न सहकारिता’ तर नंदूशेठ लांडे यांना ‘आदर्श चेअरमन’ पुरस्कार
प्रतिस्पर्धी ‘ज्ञान बिंदू’ कोचिंगचे संचालक अटकेत
याच घटनेशी संबंधित दुसऱ्या एका एफआयआरमध्ये खान सरांचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी आणि ‘ज्ञान बिंदू कोचिंग इन्स्टिट्यूट’चे संचालक रोशन आनंद यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. रोशन आनंद यांच्या समर्थकांनी आणि वकिलांनी न्यायालयामध्ये खान सरांच्या सुरक्षारक्षकाच्या जामिनाला तीव्र विरोध केला आहे. हा गोळीबार केवळ गर्दी पांगवण्यासाठी नव्हे, तर हेतुपुरस्सर करण्यात आला होता, असा आरोप वकिलांनी केला.
दुसरीकडे, रोशन आनंद यांच्या समर्थकांनी सरकार खान सरांना वाचवत असल्याचा गंभीर आरोप केला असून, खान सरांना तातडीने अटक न झाल्यास सुमारे १०,००० विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
न्यायालयाने निर्णय ठेवला सुरक्षित
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रतिस्पर्धी संचालक रोशन आनंद यांच्या जामीन अर्जावरील आपला निर्णय सुरक्षित ठेवला आहे. मात्र, दुसरीकडे खान सर यांच्यावर पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही पोलिसांना कठोर कारवाई किंवा अटक करता येणार नसल्याने तूर्तास खान सरांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.





