अण्णासाहेब मगर बँकेला ‘भारतरत्न सहकारिता’ तर नंदूशेठ लांडे यांना ‘आदर्श चेअरमन’ पुरस्कार

भोसरी | ‘भारत को-ऑपरेटिव्ह बँकिंग संस्थे’च्या वतीने लखनौ येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण शिबिरात पिंपरी-चिंचवडमधील सहकार क्षेत्राचा मोठा गौरव झाला आहे. भोसरी येथील ‘अण्णासाहेब मगर सहकारी बँके’ला अत्यंत प्रतिष्ठेचा ‘भारत रत्न सहकारिता’ (उत्कृष्ट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याच सोहळ्यात बँकेच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणारे अध्यक्ष नंदूशेठ विठोबा लांडे पाटील यांना या वर्षीचा ‘आदर्श चेअरमन’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बँकेला राष्ट्रीय पातळीवर एकाच वेळी दोन सर्वोच्च बहुमान मिळाल्यामुळे सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लखनौ येथील या विशेष प्रशिक्षण शिबिरामध्ये देशभरातील तब्बल ४६ नामांकित सहकारी बँकांनी सहभाग घेतला होता. ‘बी.एन.सी.’ आणि ‘बँकर’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतकूप’ अंतर्गत या राष्ट्रीय पुरस्कारांची निवड करण्यात आली होती. बँकेच्या वतीने पदाधिकारी आणि संचालकांनी मान्यवरांच्या हस्ते हे दोन्ही मानाचे सन्मानचिन्ह स्वीकारले.
हेही वाचा
सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात येणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण शिबिरात आणि पुरस्कार सोहळ्यात बँकेचे संचालक गणेश पवळे, संतोष भांगरे, रामदास काळजे, राजू सस्ते तसेच बँकेचे व्यवस्थापक माणिक येळवंडे प्रामुख्याने सहभागी झाले होते. या शिबिरात उपस्थित सर्व शिबिरार्थींना सहकार, आधुनिक व्यवस्थापन आणि बँकिंग क्षेत्रातील विविध विषयांवर राष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहकारी बँकिंग अधिक डिजिटल आणि सक्षम करण्यासाठीच्या नव्या संकल्पनांवर सविस्तर चर्चा झाली.
हा दुहेरी सन्मान ग्राहकांच्या विश्वासाचे फळ: अध्यक्ष नंदूशेठ लांडे
या ऐतिहासिक दुहेरी यशाबद्दल आनंद व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष नंदूशेठ विठोबा लांडे पाटील म्हणाले, “हा मिळालेला दुहेरी सन्मान म्हणजे बँकेचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी आणि मुख्यत्वे आमच्या लाखो ग्राहकांच्या दृढ विश्वासाचे फळ आहे. ‘भारत रत्न सहकारिता’ सारख्या राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च पुरस्काराने आमच्या बँकेच्या पारदर्शक कामाची दखल घेतली गेल्यामुळे, भविष्यात ग्राहकांना अधिक सक्षम आणि आधुनिक सेवा देण्यासाठी आम्हाला मोठी प्रेरणा मिळाली आहे.”
अण्णासाहेब मगर सहकारी बँकेला मिळालेल्या या राष्ट्रीय बहुमानाबद्दल बँकेच्या सर्व शाखांमधून, खातेदारांकडून आणि राजकीय तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून लांडे पाटील यांचे अभिनंदन केले जात आहे.





