पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराबद्दल वादग्रस्त विधान
विठ्ठल मंदिराचा भाग पाडण्याची मागणी; व्यापाऱ्याच्या वक्तव्याने भाविक संतप्त

पंढरपूर : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा बाबत शहरातील एका व्यापार्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा वारकरी संप्रदायासह भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आमची घर दार पाडण्यापेक्षा विठ्ठल मंदिराचा काही भाग पाडावा, अशी अचंबित करणारी आणि चिड निर्माण करणारी मागणी केली आहे. काॅरिडाॅरला विरोध करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत रा.पा.कटेकर नावाच्या एका व्यापार्याने अकलेचे तारे तोडले आहेत. वारकरी संप्रदायाच्या भावनेला व विठ्ठल मंदिराला हात घातल्याने सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे.
विठ्ठल दर्शनासाठी येणार्या भाविकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने काॅरिडाॅर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः यासाठी आग्रही आहेत. काॅरिडाॅरचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापारी, दुकानदार आणि रहिवासांशी अनेक वेळा बैठका घेतल्या आहेत. शासनाची भूमिका त्यांना समजावून सांगितली आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
प्रस्तावित काॅरिडाॅरमध्ये बाधीत होणार्या लोकांना योग्य आर्थिक मोबदला देण्यासाठी राज्य शासन तयार असल्याचे वेळोवेळी सांगितले जात आहे. तरीही मंदिर परिसरातील काही स्थानिक दुकानदारांनी मात्र काॅरिडाॅरला विरोध केला आहे. याच संदर्भात येथील संत एकनाथ भवनमध्ये एक बैठक झाली. या बैठकीमध्ये शहरातील एका नामांकित बॅंकेचा माजी अध्यक्ष असलेल्या रा.पा. कटेकर या व्यापार्याने आमची घरं दारं पाडण्यापेक्षा मंदिरातील देणगी मोजण्याचे ठिकाण, देवाचे स्वयंपाक घर, कार्यालय, मंदिराचा मुख्य सभामंडप, मंदिरातील स्वच्छता गृह आदी आनावश्यक भाग पाडावा अशी अजब मागणी करत थेट मंदिराला हात घातला आहे.
रा.पा.कटेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वसामान्य भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर वारकरी संप्रादायातील अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. रा.पा.कटेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हीडीओ सध्या समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. दरम्यान विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी रा.पा.कटेकर यांच्या या वक्तव्याचा निषेध करत, अशी मागणी करणे म्हणजे वारकर्यांच्या भावनेवर मीठ चोळल्या सारखे आहे.देवा पेक्षा कोणाही मोठा नाही. अशी वक्तव्य करताना पंढरपुरातील व्यापार्यांनी भान ठेवावे अन्यथा अशा लोकांच्या विरोधात वारकरी संप्रदाय रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा वारकरी आध्यात्मिक वारकरी सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी दिला आहे.
पंढरपूर आणि विठ्ठल मंदिर हे अखिल विश्वाचे माहेर घर आहे. अशा देवाचे मंदिर पाडण्याची भाष करणे म्हणजे नरकात जाण्यासारखे आहे. मंदिराचा भाग पाडा अशी मागणी करणार्या लोकांची किव येते. ज्यांच्या अनेक पिढ्या याच विठ्ठल मंदिराच्या जीवावर जगल्या. तेच लोक आता देवाचा तिरस्कार करु लागले आहेत. अशा लोकांना संत तुकारामांच्या भाषेतच समजावण्याची गरज आहे. शासनाने अशा वाचाळवीरांवर तातडीने कारवाई करावी.