जम्मू आणि काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन छत्रू’; जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरमधील किश्तवार जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. जैश-ए-मोहम्मदच्या दोन ते तीन दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांनी घेरले असल्याचे वृत्त आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर आज संध्याकाळी चतरूच्या कुछल भागात सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती, तेव्हा ही चकमक सुरू झाली.
सुरक्षा दलाच्या शोध पथकांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यामुळे चकमक सुरू झाली आणि शेवटचे वृत्त येईपर्यंत ही चकमक सुरूच होती. परिसरात कडक घेराबंदी ठेवण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अतिरिक्त दल पाठवण्यात आले आहे.
“विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, किश्तवारमधील कंझल मांडू येथे संयुक्त शोधमोहीम सुरू होती. दहशतवाद्यांच्या ठिकाणाचा शोध लागला असून कारवाई सुरू आहे,” असे जम्मूस्थित व्हाईट नाईट कॉर्प्सने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा – इंदापूर तालुक्यातील प्रवीण माने यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, घेरा मजबूत करण्यासाठी आणि दहशतवाद्यांना पकडण्यासाठी अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. सुरुवातीच्या वृत्तानुसार, जैश-ए-मोहम्मद संघटनेचे दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याचे मानले जात आहे.
आज तत्पूर्वी, जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मूहून श्री अमरनाथ यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. याचबरोबर वार्षिक यात्रेची औपचारिक सुरुवात झाली. याच पार्श्वभूमीवर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. यात्रेकरू बालटाल आणि पहलगाम, दोन्ही मार्गांनी प्रवास करणार आहेत.
९ एप्रिल रोजी, दहशतवादी कारवायांच्या गुप्तचर अहवालानंतर छत्रू वन परिसरात चकमक झाली होती. त्यानंतरच्या काही दिवसांत, तीन जैश-ए-मोहम्मद दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. याचबरोबर त्यांच्याकडून एके आणि एम४ रायफल्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.