न्यूयॉर्कचे अलिशान हॉटेल मँडरिन रिलायन्स इंडस्ट्रीज विकत घेणार
![New York's Alishan Hotel will be acquired by Mandarin Reliance Industries](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/images-15.jpeg)
उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज न्यूयॉर्कमधील मँडरिन ओरिएन्टल हे आलिशान हॉटेल ९.८१५ कोटी डॉलर्सना खरेदी करणार आहे. ही माहिती कंपनीने शनिवारी दिली. त्याबाबतचा करार रिलायन्सने केला आहे.रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट अँड होल्डिंग लिमिटेडने कोलंबस सेंटर कार्पोरेशनच्या न्यूयॉर्कमधील मँडरिन ओरिएंटल या आलिशान हॉटेलचे ७३.३७ टक्के भाग भांडवल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा करार रिलायन्सने केला आहे. मुंबई शेअर बाजाराला रिलायन्स इंडस्ट्रीजने पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. कंपनीच्या व्यवसायिक धोरणाचा एक भाग म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे कंपनीने पत्रात म्हटले आहे. या समूहाने ओबेरॉय हॉटेल्समध्येही गुंतवणूक केली आहे. मँडरिन ओरिएन्टल हे सेंट्रल पार्क आणि कोलंबस सर्कलजवळ बांधलेले एक मोठे अलिशान हॉटेल आहे. जागतिक स्तरावर महत्त्वाचे म्हणून ते ओळखले जाते. २००३ मध्ये त्याची स्थापना झाली. त्याने आतापर्यंत अनेक पुरस्कार जिंकले आहेत.