“हिंदू राहिला नाही तर…”; सरसंघचालक मोहन भागवतांचे विधान चर्चेत

Mohan Bhagwat | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मनिपूरच्या दौऱ्यात हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीच्या सातत्याबद्दल केलेले विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका सभेला संबोधित करताना भागवत यांनी म्हटले की, हिंदू समाज हा अमर आहे आणि जर हिंदू राहिला नाही तर जगही टिकू शकणार नाही. मनिपूर भेटीदरम्यान भाषण करताना त्यांनी अनेक प्राचीन साम्राज्यांच्या इतिहासाचा दाखला दिला. यूनान (ग्रीस), मिस्त्र (इजिप्त) आणि रोमसारखी मोठी साम्राज्ये काळाच्या ओघात नष्ट झाली, पण भारताने आपले अस्तित्व टिकवून ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.
सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, परिस्थितीचा विचार तर सर्वांना करावा लागतो. पण परिस्थिती येते आणि जाते. जगात सर्व देशांना वेगेगळ्या परिस्थितींचा सामना करावा लागला. काही देश त्यामध्ये संपुष्टात आले. यूनान, मिस्त्र, रोमा सब मिट गये जहां से, कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी (ग्रीक, इजिप्त, रोम यासारखी साम्राज्य जगातून नष्ट झाली, काहीतरी असेल की आपले अस्तित्व संपुष्टात आले नाही).
हेही वाचा : ‘जनतेचा विश्वास-विकासाचा प्रवास’ : माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे
मोहन भागवत पुढे बोलताना म्हणाले की, भारत हे एक अमर समाजाचे नाव आहे. बाकी सर्व आले, चमकले आणि निघून गेले. मात्र या सर्वांचा उदय आणि अस्त आपण पाहिला आहे आणि आपण अजूनही आहोत आणि राहणार आहोत. कारण आपण आपल्या समाजाचे एक बेसिक नेटवर्क तयार केले आहे. ज्यामुळे हिंदू समाज टिकून राहिल. हिंदू राहिला नाही, तर जगही राहणार नाही. कारण ही जी धर्म नावाची गोष्ट आहे, ज्याचा मी उल्लेख केला तो वेळोवेळा जगून जगाला देणे हे हिंदू समाजच करेल, त्याचे हे परमेश्वराने सोपवलेले कर्तव्य आहे.




