‘मेड इन इंडिया’ ग्रेनेड भारतीय लष्कराला सुपूर्द
!['Made in India' grenade handed over to Indian Army](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/canva-photo-editor-5.png)
पुणे |
भारतातील एका खासगी कंपनीने प्रथमच ग्रेनेड तयार केले असून त्याची पहिली बॅच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यात आली आहे. हे मल्टी-मोड हँड ग्रेनेड (MMHG) नागपूरमधील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेडने डीआरडीओच्या मदतीने तयार केले आहेत. भारतीय लष्करासाठी भारतात दारुगोळा तयार होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडच्या मालकीची असलेल्या कंपनीने मागील महिन्यापासून सशस्त्र दलांना शस्त्रे पुरवण्यास सुरुवात केली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक लाख MMHG च्या पहिल्या खेपीची गुणवत्ता तपासणी यशस्वी झाली असून ती लष्कराचा सोपवण्यात आली आहे. यानिमित्त मंगळवारी ईईएलच्या दोन हजार एकर संरक्षण उत्पादन केंद्रावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एमएमएचजीचे ग्रेनेड ईईएलचे अध्यक्ष एस एन नुवाल यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना सुपूर्द केले. या कार्यक्रमात भारतीय लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे, लेफ्टनंट जनरल एके सामंत्र, डीजी इन्फंट्री आणि डॉ. जी सतीश रेड्डी, डीआरडीओचे अध्यक्ष आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
- करार कधी झाला…
ऑक्टोबर २०२० मध्ये नागपुरातील ईईएल आणि संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्कर आणि हवाई दलाला १० लाख आधुनिक हँड ग्रेनेड पुरवठ्यासाठी करार केला होता. या करारानुसार बल्क प्रॉडक्शन क्लिअरन्स (बीपीसी) दोन वर्षांमध्ये होईल.
- ग्रेनेड्सची वैशिष्ट्ये…
हे ग्रेनेड पहिल्या महायुद्धाच्या विंटेज डिझाइनच्या ३६ क्रमांकाच्या ग्रेनेडची जागा घेणार आहेत. या आधुनिक ग्रेनेडमध्ये बचावात्मक आणि ऑफेंसिव्ह परिस्थितीत लवचिक रहावे, यासाठी एक विशिष्ट रचना करण्यात आली आहे. डीआरडीओच्या टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरीने हे ग्रेनेड डिझाईन केले आहेत. २०१६ मध्ये ईईएलने डीआरडीओ कडून तंत्रज्ञान शिकून घेतले आणि डेटोनिक्सचा दर्जा कायम राखत ते बनवले. भारतीय लष्कर आणि DGQA द्वारे विविध ठिकाणी वेगवेगळ्या तापमानात या ग्रेनेडच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.