breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: Cheers… मद्याच्या होम डिलिव्हरीला सुरुवात; स्विगी देणार घरपोच सेवा

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारनं मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी मद्यविक्रीच्या दुकांनांबाहेर मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु त्यानंतर सोशल डिस्टन्सचं पालन व्हावं आणि दुकानांबाहेरील गर्दी कमी व्हावी यासाठी अनेक राज्यांनी ऑनलाइन मद्यविक्रीला सुरूवात केली होती. त्यानंतर स्विगी आणि झोमॅटो या कंपन्यांनी घरपोच मद्यविक्रीसाठी परवानगी मागितली होती. दरम्यान, आजपासून झारखंडमधील रांचीमध्ये स्विगीनं घरपोच मद्यविक्रीला सुरूवात केली आहे.

स्विगीनं आपल्या अॅपमध्ये वाईन शॉप्स ही कॅटेगरी सुरू केली असून त्याद्वारे ऑर्डर करणाऱ्यांना घरपोच मद्य पोहोचवलं जाणार आहे. सध्या झारखंडमधील रांची येथे ही सेवा सुरू करण्यात आली असून हळूहळू राज्यातील अन्य शहरांमध्येही ही सेवा सुरू केली जाणार असल्याचं स्विगीकडून सांगण्यात आलं. ईकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. तर दुसरीकडे झोमॅटोही घरपोच मद्य पोहोचवण्याची सेवा देणार असून उद्यापासून त्यांची ही सेवा रांचीमध्ये सुरू होणार आहे. तसंच येत्या काही दिवसांमध्ये अन्य शहरातही या विस्तार करण्यात येणार असल्याचं कंपनीनं सांगितलं.

“आमचा विश्वास आहे की तंत्रज्ञानाच्या मदतीनं पुरवल्या जाणाऱ्या सेवेमुळे व्यक्ती ठराविक प्रमाणात मद्याचं सेवन करतील. तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं सोशल डिस्टंन्सिंगसाठीही तो एक पर्याय ठरू शकतो,” असं झोमॅटोच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आलं. सध्या स्विगीला झारखंड सरकारकडून यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या आहे. तसंच सध्या अन्य राज्य सरकारांशीदेखील आवश्यक त्या परवानग्या मिळवण्यासाठी चर्चा सुरू असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.

“सुरक्षित आणि जबाबदार पद्धतीनं घरपोच मद्यविक्री करून दुकानांबाहेर होणाऱ्या गर्दीला आळा घालू शकतो. तसंच किरकोळ मद्यविक्रीच्या दुकानांचा व्यवसायही वाढवू शकतो,” अशी प्रतिक्रिया स्विगीचे उपाध्यक्ष (प्रोटक्ट्स) अनुज राठी यांनी दिली. तसंच या घरपोच मद्यविक्री करताना नियमांची योग्य ती काळजी घेण्यात येणार असून ग्राहकांना वयाचा दाखला दाखवावा लागणार आहे. ग्राहकांना ऑर्डर करताना त्यांच्या सेल्फीसह आयडी प्रुफही अपलोड करावं लागणार असल्याचं कंपनीनं सांगितलं. तसंच घरपोच सेवा घेताना ग्राहकांना मिळालेला ओटीपीदेखील व्हेरिफाय करावा लागणार आहे. मद्याच्या ऑर्डरवर मर्यादा ठेवण्यासाठी हे केलं जात असल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button