breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#Lockdown: धक्कादायक… ५४ दिवसांपासून दिल्ली विमातळावर राहतोय जर्मनीमधील Most Wanted आरोपी

देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकांना या लॉकडाउनचा फटका बसला आहे. परदेशातून भारतात आलेल्यांनाही लॉकडाउनचा फटका बसला असून अनेकजण भारतातच अडकून पडले आहेत. मात्र लॉकडाउन सुरु झाल्यापासून दिल्ली विमानतळावर अडकून पडलेला एक मध्यमवयीन जर्मन व्यक्ती ही जर्मनीमधील मोस्ट वॉण्टेड आरोपी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ट्रान्झीटमध्ये ४० वर्षीय एडगार्ड झीबॅट हा व्यक्ती मागील ५४ दिवसांपासून राहत आहे. एडगार्ड हा व्हिएतनामहून व्हिएटजेट एअरच्या विमानाने १८ मार्च रोजी दिल्लीत दाखल झाला. इस्तंबूलला जाणारे विमान पकडण्यासाढी एडगार्डने दिल्लीमध्ये हॉल्ट घेतला होता. मात्र याच दिवशी भारताने तुर्कीला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमानांवर बंदी घातली. त्यानंतर एडगार्डने पुन्हा व्हिएतनाममधील होनोईला जाण्याची तयारी केली. मात्र पुढील चार दिवसांमध्ये भारताने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली आणि २५ मार्चपासून देशामध्ये लॉकडाउन सुरु झाला. त्यामुळे एडवर्ड भारतातच अडकून पडला.

विमानसेवेवर निर्बंध घालण्यात आल्याने अनेक परदेशी प्रवासी दिल्ली विमानतळावर अडकून पडले असले तरी एडवर्डचे प्रकरण थोडं वेगळं आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी एडवर्डबद्दल जर्मन दुतावासाला माहिती दिली. मात्र एडवर्डवर जर्मनीमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याने आम्ही त्याला आश्रय देणार नाही अस भारतातील जर्मन दुतावासाने स्पष्ट केलं.

“वितानतळावर ट्रान्झीट एरियामध्ये एक आठवडा पाच पर्यटक अडकून पडले होते. त्यापैकी एडवर्डबरोबर दोन जण श्रीलंकेचे होते तर प्रत्येकी एक जण मालदीव आणि फिलिपिन्सचे होते.  सर्व देशांच्या भारतीय दुतावासांना यासंदर्भात माहिती कळवण्यात आल्यानंतर त्या देशांच्या दुतावासांनी आपल्या नागरिकांना आश्रय देत त्यांच्या राहण्याची सोय करत त्यांना क्वारंटाइन केलं. मात्र जर्मन दुतावासाने एडवर्डला आश्रय देण्यास नकार दिला. एडवर्डवर जर्मनीमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने आम्ही त्याला आश्रय देऊ शकत नाही असं जर्मन दुतावासाने भारतीय अधिकाऱ्यांना कळवलं,” असं विमानतळावरील एका अधिकाऱ्याने गुप्ततेच्या अटीवर सांगितलं आहे.

जर्मन दुतावासाने नकार दिल्याने भारताने एडवर्डला व्हिसा नाकारला आहे. मात्र यातही गोंधळात टाकणारी बाब म्हणजे सध्या ट्रान्झीट एरियामध्ये राहणाऱ्या एडवर्डने भारतीय व्हिजासाठी अर्जच केला नाहीय. वितानतळावरील ट्रान्झीट एरियामध्ये एखाद्या प्रवाशाला एक दिवस राहता येते. मात्र एडवर्ड येथे मागील ५४ दिवसांपासून राहत आहे. या परिसरामध्ये बाहेर पडण्यासाठी ट्रान्झीट पॅसेंजरला (जे एखाद्या तिसऱ्या देशात विमान बदलण्यासाठी उतरलेले असता) त्या देशातील व्हिसासाठी अर्ज करावा लागतो. मात्र तो अर्ज एडवर्डने केलेला नाही.

एडवर्डसंदर्भात दिल्ली पोलीस तसेच विमातळ पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. त्यांनीही अनेकदा जर्मन दुतावासाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असून दुतावासाने त्यांच्या कॉल तसेच मेसेजला कोणतेही उत्तर दिलेले नाही अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

एडवर्ड हा सध्या ट्रान्झीट एरियामध्येच राहत आहे. येथे तो दिवसभर मासिके आणि वृत्तपत्रे वाचतो. अनेक तास आपल्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी फोनवरुन बोलत असतो. विमानतळावरील काही दुकाने अद्याप सुरु असून तेथून तो अन्नपदार्थ विकत घेऊन खातो. येथील सफाई कर्मचारी, कामगार यांच्याशी तो गप्पा मारताना दिसतो. विमातनळावरील वॉशरुम आणि बाथरुम तो वापरतो असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

एडवर्डला कोणत्याही प्रकारची मदत हवी आहे का यासंदर्भात चौकशी केली असता त्याने अधिकाऱ्यांना ‘मी माझा खर्च भागवू शकतो’ असं सांगितलं. “तो कधी जमीनीवर, कधी बाकड्यांवर झोपलेला दिसतो. या परिसरात सध्या तो एकटाच राहत आहे,” असं दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु असल्याचेही काही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

लॉकडाउनला ४० दिवस झाल्यानंतर म्हणजेच मे महिन्याच्या सुरुवातील एडवर्डच्या आरोग्याबद्दल चिंता वाटू लागल्याने काही सुरक्षा अधिकारी त्याची चौकशी करण्यासाठी आणि त्याला भेटण्यासाठी आतमध्ये गेले. तेव्हा एडवर्ड अगदी व्यवस्थित दिसला. त्याच्या वागण्या-बोलण्यात काहीच बदल जाणवत नव्हता. सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो ठणठणीत असल्याचे दिसून आलं. त्यानंतर काही अधिकारी वरचे वर त्याची चौकशी करायला जात असतात, असं येथील एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.

मागील आठवड्यात तुर्कीला जाणाऱ्या विमानामध्ये एडवर्डला पाठवण्याचा प्रयत्न भारताने केला. मात्र तुर्कीने हे विमान केवळ तुर्कीमधील लोकांसाठी असल्याचे सांगत एडवर्डला घेऊन जाण्यास नकार दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button