युक्रेनच्या रासायनिक अमोनिया गॅसची गळती; नागरिकांना भूमिगत होण्याचे आवाहन
कीव | रशिया-युक्रेन युद्धाचा आज २६ वा दिवस आहे. कोणत्याही परिस्थितीत शस्त्र खाली ठेवणार नाही, असे युक्रेनने स्पष्ट केले आहे. रशियाने हल्ले सुरुच ठेवले आहेत. रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात सुमीतील रासायनिक प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. हल्ल्यामुळे अमोनिया गॅसची गळती सुरू झाल्याने युक्रेन सरकारने शहरातील नागरिकांना भूमिगत होण्याचे आवाहन केले आहे.
सुमीचे गव्हर्नर दिमित्रो जियवेत्स्की यांनी सांगितले की, आज पहाटे साडेचार वाजता रशियाने हवाई हल्ला केला. यामुळे सुमी शहरातील रासायनिक प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. अमोनिया गॅसची गळती सुरु झाली, सुमारे अडीच किलोमीटरहून अधिक परिसराला याचा फटका बसला. परिसरातील नागरिकांना भूमिगत होण्याचे आवाहन केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, युक्रेनची राजधानी कीवमधे रशियाने केलेल्या हल्ल्यात चार नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेन आपत्तकालीन सेवेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे अनेक ठिकाणी आग लागली. आगीत होरपळून चौघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.