कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा राजीनामा
बंगळुरू – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय मतभेदानंतर अखेर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. आता सायंकाळी चार वाजता ते राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत. दरम्यान, येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण असेल यावर आता चर्चा रंगली आहे. एक दोन दिवसात नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित केले जाणार असून सध्या तरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रल्हाद जोशी यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.
नाट्यमय घडामोडींनंतर कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी यांचे सरकार 23 जुलै 2019 रोजी कोसळले होते. विश्वासदर्शक ठरावावेळी कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी बहुमत सिद्ध करू शकले नव्हते. यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार कोसळून भाजपाचे सरकार आले. बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने फक्त 99 मते, तर विरोधात 105 मते पडली होती. त्यानंतर बी एस येडियुरप्पा यांनी 26 जुलै 2019 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र यंदा बंगळुरुत झालेल्या धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर गेल्या गुरुवारी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केले. ’25 जुलैला हायकमांडकडून मला नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन. पक्ष मजबूत करणे आणि पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे, या दृष्टीने माझी पुढची वाटचाल असेल. मी दिवसरात्र त्यासाठीच मेहनत करत असतो, कृपया सहकार्य करा’, असे वक्तव्य बीएस येडियुरप्पा यांनी केले होते.