न्यायमूर्ती सूर्य कांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश; सात देशांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या उपस्थितीत शपथविधी

CJI Surya Kant | न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी आज (२४ नोव्हेंबर) भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात त्यांना पदाची शपथ दिली. मावळते सरन्यायाधीश भूषण गवई हे २३ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर सूर्य कांत यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. पुढील १५ महिने, म्हणजे ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत राहतील.
या शपथविधीचे खास वैशिष्ट्य म्हणजे सात देशांच्या मुख्य न्यायमूर्तींची उपस्थिती. भूतानचे मुख्य न्यायमूर्ती ल्योनपो नोरबू शेरिंग, केन्याच्या न्यायमूर्ती मार्था कूमे, मलेशियाच्या संघीय न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती नलिनी पथमनाथन, मॉरीशसच्या बीबी रेहाना मुंगली-गुलबुल, तसेच नेपाळचे मुख्य न्यायमूर्ती प्रकाश मान सिंह राऊत यांसह अन्य मान्यवरांनी या ऐतिहासिक सोहळ्याला हजेरी लावली.
हेही वाचा : सीमा बदलू शकतात, सिंध पुन्हा भारतात येऊ शकतो; राजनाथ सिंह यांचे मोठे विधान
सूर्य कांत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम ३७० रद्द करण्याशी संबंधित खटले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांविषयक प्रकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कोण आहेत न्यायमूर्ती सूर्य कांत?
१० फेब्रुवारी १९६२ रोजी हरियाणातील हिसार येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सूर्य कांत यांनी १९८१ साली हिसारच्या शासकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९८४ मध्ये रोहतकच्या महर्षी दयानंद विद्यापीठातून एलएलबी पदवी घेतली आणि हिसार जिल्हा न्यायालयात वकिलीला सुरुवात केली. सरन्यायाधीश म्हणून त्यांचा प्रवास देशाच्या न्यायिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.




