ताज्या घडामोडीविदर्भ

झुल्लर गावातील मौदा तालुक्यातील श्रीजी ब्लॉक सिमेंट कारखान्यात स्फोट

बॉयलरचे तापमान वाढल्यामुळेच स्फोट झाल्याची माहिती तपासातून समोर

नागपूर : मौदा तालुक्यातील झुल्लर गावातील श्रीजी ब्लॉक सिमेंट कारखान्यात मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास झालेल्या स्फोटाचे कारण समोर आले आहे. बॉयलरचे तापमान वाढल्यामुळेच स्फोट झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या स्फोटात क्रेन ऑपरेटर नंदकिशोर करंडे (४०, झुल्लर) याचा जागीच मृत्यू झाला तर ९ जण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना नागपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राजेंद्र किसन उमप (झुल्लर), हुसैन बशिर सैयद (वडोदा), स्वप्निल नारायण सोनकर (वडोदा), कल्लू उमेदा शाहू (वडोदा), कुंवरलाल गुणाजी भगत (वडोदा), वंश विष्णू वानखडे (झुल्लर), गुणवंत दौलतराव गजभीये (वडोदा), रामकृष्ण मनोहर भूते (वडोदा) आणि ब्रम्हानंद रामा मानगुडधे (रानमांगली) अशी स्फोटातील जखमींची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मौदा तालुक्यातील झुल्लर गावात श्री.जी ब्लॉक नावाने सिमेंटच्या विटा बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात जवळपास ४० ते ५० मजूर काम करतात. इमारतीसाठी लागणाऱ्या सिमेंटच्या विटा बनवण्यासाठी कारखान्यात चार बॉयलर आहेत. मंगळवारी पहाटेच्या सुमारास काही मजूर कारखान्यात काम करीत होते. यादरम्यान बॉयलरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात क्रेन ऑपरेटर नंदकिशोर करंडे याचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर नऊ मजूर गंभीर जखमी झाले. घटना घडताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कारखान्याकडे धाव घेतली. जखमींना नागपुरातील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी मौदा पोलीस पुढील तपास करीत आहेत. हा स्फोट नेमका कशाने झाला याबाबत अद्याप कुणीही अधिकृतरित्या बोलायला तयार नाही.

मृताच्या कुटुंबियांना ३० लाखांची आर्थिक मदत
नंदकिशोर करंडे हे गेल्या आठ वर्षांपासून श्री. जी, ब्लॉक कंपनीत क्रेन ऑपरेटर पदावर नोकरीवर होते. त्यांना पत्नी प्रिती, मुलगा रित्विक आणि आई इंदिराबाई या सर्वांच्या पालनपोषणाची जबाबदारी नंदकिशोर यांच्यावर होती. कंपनीच्या व्यवस्थापनाशी स्थानिक लोकप्रतिनिधींनी चर्चा केली. व्यवस्थापनाने मृत नंदकिशोर करंडे यांच्या कुटुंबियांना ३० लाखांची मदत करण्याचे घोषित केले. तासाभरात १० लाखांचा धनादेश देण्यात आला. ५-५ लाख रुपये पत्नी व मुलींच्या नावे बँकेत एफडी करण्यात येईल तर पीएफ आणि अन्य देय रक्कम त्वरित देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला.

नुकताच झाला होता धामण्यात स्फोट
नागपूरजवळील धामना गावातील चामुंडी या दारूगोळा कंपनीत गेल्या दोन महिन्यांपूर्वी स्फोट होऊन सहा कामगारांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले होते. उपचारा दरम्यान जखमींचासुद्धाही मृत्यू झाला होता. या कंपनीचे मालक जय शिवशंकर खेमका आणि व्यवस्थापक सागर देशमुख यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कंपनीत फटाक्याच्या वाती तयार केल्या जातात. येथे शंभरावर मजूर कामाला होते.

मागच्या वर्षी बाजारगावच्या स्फोटातही ९ जणांचा मृत्यू
नागपूर-अमरावती मार्गावरील बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीमध्ये मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अशाच प्रकारची घटना घडली होती. यात ९ कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. घटनेदरम्यान नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने या घटनेचे राजकीय पडसाद देखील उमटले होते. सोलारमध्ये भारतीय लष्करासाठी दारूगोळा निर्मितीचे कार्य केले जात होते. अप्रशिक्षित कामगारांना कामावर ठेवल्याने ही घटना घडल्याचा आरोप होता. ‘पेसो’ ने घटनेच्या तब्बल अडीच महिन्यानंतर अहवाल सादर केला. मात्र हा अहवाल कधीच सार्वजनिक करण्यात आला नसल्याने घटनेमागील कारणे आणि दोषी पुढे येऊ शकले नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button