हॉर्मुझमध्ये इराणची ‘वसुली’; एका जहाजाला जाण्यासाठी मोजावे लागतात तब्बल ‘इतके’ कोटी

Strait Of Hormuz | अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षामध्ये इराणकडून आता हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून बेकायदेशीर शुल्क आकारले जात आहे. काही विशिष्ट जहाजांना या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरून जाण्याची परवानगी देण्यासाठी लाखो डॉलर्सची मोठी मागणी इराणकडून केली जात आहे. युद्धाचा अवाढव्य खर्च भागवण्यासाठी इराण एका जहाजाकडून तब्बल 20 लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 16 ते 17 कोटी रुपये वसूल करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘इराण इंटरनॅशनल’ने दिलेल्या वृत्तानुसार इराण संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे सदस्य अलादीन ब्रूजेर्दी यांनी या वसुलीचे उघडपणे समर्थन केले आहे. युद्धासाठी मोठा खर्च येत असल्याने आम्ही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून ट्रान्झिट शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासांच्या आत हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याचा अत्यंत कडक अल्टिमेटम दिला आहे.
हेही वाचा : ‘खरात प्रकरणातील हिडीस तपशील वाचून गरगरल्यासारखं झालं’; राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया
जर इराणने हा मार्ग खुला केला नाही, तर त्यांचे वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या जातील, असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या या धमकीला उत्तर देताना इराणने प्रतिआव्हान दिले असून इस्रायलचे ऊर्जा प्रकल्पही त्यांच्या टप्प्यात असल्याचे म्हटले आहे. तसेच, हे सर्व प्रकल्प एकाच दिवसात नष्ट करण्याची मोठी क्षमता इराणकडे असल्याचे त्यांनी अमेरिकेला अतिशय स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.
जागतिक बाजारपेठेवर या वाढत्या तणावाचे काळे सावट आता अतिशय स्पष्टपणे दिसत असून गुंतवणूकदारांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. आयजी मार्केटचे विश्लेषक टोनी सायकामोर यांच्या मते ट्रम्प यांच्या धमकीमुळे जागतिक बाजारावर एक प्रकारचा ‘टाइम बॉम्ब’ टिक-टिक करत आहे. हा वाद 48 तासांत निवळला नाही तर सोमवारी जागतिक शेअर बाजार कोसळून ‘ब्लॅक मंडे’ ओढवू शकतो आणि कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात.
इराणच्या सैन्य दलाने स्पष्ट केले आहे की, जर अमेरिकेने वीज प्रकल्पांवर हल्ला केला तर हॉर्मुझची सामुद्रधुनी कायमची बंद करण्यात येईल. जोपर्यंत उद्ध्वस्त झालेले प्रकल्प पुन्हा उभे राहत नाहीत तोपर्यंत एकही जहाज तिथून हलणार नसल्याची मोठी धमकी त्यांनी दिली आहे. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेचे राजदूत माईक वॉल्ट्झ यांनी इराणला ऊर्जा पुरवठा थांबवू देणार नसल्याचे सांगत या क्षेत्राकडे अमेरिकेची युद्धनौका रवाना झाल्याचे स्पष्ट केले आहे.





