इंधन तुटवड्याचे संकट टळणार? इराणकडून भारतासाठी गॅस टँकर्सना विशेष परवानगी

Iran India Gas Tankers Strait of Hormuz | आखाती प्रदेशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने भारतासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. इराणने दोन भारतीय ध्वजधारक लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) वाहून नेणाऱ्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची विशेष परवानगी दिली आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम करणाऱ्या इराणच्या नाकेबंदीमध्ये भारतासाठी करण्यात आलेला हा दुर्मिळ अपवाद असल्याचे वृत्त रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
‘शिवालिक’ या भारतीय ध्वजधारक एलपीजी टँकरने भारतीय नौदलाच्या संरक्षणाखाली होर्मुझ सामुद्रधुनी पार केली असून, ‘नंदा देवी’ हे दुसरे जहाजही पुढील काही तासांत तेथून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला सुरू केल्यानंतर तेहरानने या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर रोखली आहे. इराणच्या किनारपट्टीलगत असलेली ही सामुद्रधुनी जगातील सुमारे २० टक्के तेल आणि सागरी मार्गाने होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
या पार्श्वभूमीवर भारताने इराणकडे विशेष सवलतीची मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करत आखाती देशांतून वस्तू आणि ऊर्जा वाहतुकीच्या मुद्द्यावर चर्चा केली होती.
तसेच युद्ध सुरू झाल्यानंतर भारतात आलेल्या एका जहाजावरील १८३ इराणी खलाशांना भारताने सुरक्षित आश्रय दिला आहे. हे जहाज भारतात सरावासाठी सहभागी झालेल्या तीन जहाजांपैकी एक होते. त्यापैकी आणखी एक जहाज श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ अमेरिकन टॉर्पेडो हल्ल्यात बुडाल्याची माहितीही समोर आली आहे.





