भारतीय सेनेने १०० किमी आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले; अमित शाह यांचा मोठा दावा

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारतीय सेनेने पाकिस्तानात १०० किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा मोठा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी केला. एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबा यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयांना लक्ष्य केल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने दहशतवादाला अभूतपूर्व प्रत्युत्तर दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अमित शाह म्हणाले, “मोदी यांनी सत्ता स्वीकारल्यापासून दहशतवादी हल्ल्यांना असे सडेतोड उत्तर दिले गेले आहे की, संपूर्ण जग थक्क झाले आहे आणि पाकिस्तान घाबरला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सेनेने दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले, जिथे त्यांचे प्रशिक्षण आणि लपण्याची ठिकाणे होती.”
हेही वाचा – पंतप्रधान मोदींचा मास्टर स्ट्रोक! शशी थरूर, सुप्रिया सुळे यांच्यावर विशेष जबाबदारी
शाह यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, भारतीय सेनेने पाकिस्तानच्या हद्दीत १०० किलोमीटर आत घुसून दहशतवादी छावण्या नष्ट केल्या. “आमच्या सैन्याने दहशतवाद्यांना असा धडा शिकवला की त्यांचे तळ पूर्णपणे उध्वस्त झाले,” असे त्यांनी सांगितले.
या कारवाईमुळे भारताच्या सामरिक सामर्थ्याचा आणि दहशतवादाविरुद्धच्या कठोर धोरणाचा जागतिक पातळीवर पुन्हा एकदा दबदबा निर्माण झाला आहे. शाह यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.