TOP Newsताज्या घडामोडी

आव्हानात्मक परिस्थितीप्रसंगी नेहमी मीच पुढे – सारथी विभागीय कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा

आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली की नेहमीच आपल्याला पुढे केले जाते. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांचे आंदोलन सुरू असताना तेच घडले होते. अशी आव्हाने अंगावर घेण्याच्या धाडसामुळे राज्यात नवे सरकार आले असून हे धाडसी सरकार आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केला.

छत्रपती शाहू महाराज, संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ‘सारथी’ पुणे च्या नाशिक विभागीय कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून मराठा, कुणबी समाजातील तरूणांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून तरूणांचे भविष्य घडविण्याचे उदात्त धोरण अंगिकारणाऱ्या ‘सारथी’ ला सर्वतोपरी मदत शासनामार्फत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. मराठा समाजातील तरूणाईला कौशल्य विकासाचे धडे देण्याबरोबरच त्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि अर्थिक विकास होण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम सारथीच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. शासन सारथीच्या सर्व आवश्यकतांची पूर्ती करणार असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मराठा समाजाला मिळवून देण्यासाठी जे जे काही शक्य आहे ते शासन करत राहील. गरजू लोकांना शासनामार्फत दिली जाणारी शिधाभेट साखर, रवा, तेल व चनाडाळ ही वेळेत सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या सूचनाही प्रशासनास दिल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे तसेच नरेंद्र दराडे, दिलीप बनकर, ॲड. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे या आमदारांसह संभाजीराजे भोसले, सारथीचे अध्यक्ष मधुकर कोकाटे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, उपव्यवस्थापकीय संचालक नितीन गावंडे आदी उपस्थित होते.

सारथीच्या मध्यमातून तरूणांना दिशा – संभाजीराजे भोसले
सारथीच्या माध्यमातून मराठा, मराठा-कुणबी समाजाच्या तरुणांना दिशा मिळत आहे. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे सारथीमुळे विविध स्पर्धा परीक्षांमधून ५० विद्यार्थ्यांची आज देशाच्या सेवेत वरिष्ठ अधिकारी पदांवर निवड झाली आहे. सारथी च्या जडण-घडणीत मुख्यमंत्री शिंदे यांचे मोठे योगदान व पाठबळ आहे. मुख्यमंत्र्यांनी सारथीच्या योजना तळागाळात पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी संभाजीराजे भोसले यांनी केले.

बाळासाहेबांची शिवसेना संपर्क कार्यालयाचे उदघाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या राज्यातील पहिल्या संपर्क कार्यालयाचे ढोल-ताशांच्या गजरात उद्घाटन करण्यात आले. समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पक्षाने संघटनेचे कार्यालय कार्यान्वित करून पुढील तयारीला वेग दिला आहे. नाशिक शहर व जिल्ह्याचे हे संपर्क कार्यालय गंजमाळ भागातील रेणूका प्लाझामध्ये दुसऱ्या मजल्यावर आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे राज्यातील जिल्हास्तरावरील हे पहिलेच कार्यालय आहे.

( नाशिक येथे सारथी विभागीय कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संभाजीराजे भोसले, खा. हेमंत गोडसे आदी )

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button