“युक्रेनवर हल्ला केला नसता तर…”; रशियासोबत वाटाघाटीच्या चर्चेसाठी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची अट
!["If Ukraine had not been attacked"; Condition of the President of Ukraine for negotiations with Russia](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/WhatsApp-Image-2022-02-27-at-1.40.49-PM.jpeg)
नवी दिल्ली |
रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध आता आणखी पेट घेऊ लागलं आहे. यामध्ये दोन्ही देशांच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी, बाजारपेठा यांच्यावरही या युद्धाचा परिणाम होत आहे. अशातच अनेक राष्ट्रांनी या दोघांनाही शांततापूर्ण चर्चेतून निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. मात्र युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी चर्चेसाठी एक अट घातली आहे. आपण रशियासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. परंतु बेलारूसमध्ये चर्चेसाठी तयार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. रशियाने बेलारूसच्या प्रदेशातून युक्रेनवर हल्ला केला नसता तर मिन्स्कमध्ये चर्चा होऊ शकली असती, असं युक्रेनचे राष्ट्राध्य़क्ष झेलेन्स्की यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, युद्धामुळे हजारो युक्रेनियन लोकांनी आपली घरे सोडली आहेत. UN अधिकार्यांनी सांगितले की युक्रेनमधून १ लाख २० हजारांहून अधिक लोक पोलंड, मोल्दोव्हा आणि इतर शेजारील देशांमध्ये निघून गेले आहेत. दरम्यान, सोमवारी सकाळपर्यंत शहरातील कर्फ्यू सुरू राहणार असल्याचे किव्हमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियन सैन्य राजधानीच्या दिशेने कूच करत आहे.रशियन सैन्याने सर्व बाजूंनी युक्रेनची राजधानी किव्हकडे येण्यास सुरुवात केली आहे. रविवारी पहाटे वासिल्किवमध्ये राजधानीच्या दक्षिणेला दोन मोठे स्फोट ऐकू आले, अशी बातमी रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली.