अंदमान-निकोबारमध्ये ‘असानी’ चक्रीवादळ धडकले;
![Hurricane Asani hits Andaman-Nicobar;](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/asani-cyclone.png)
नवी दिल्ली | आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचं रविवारी चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. 2022 मधलं पहिलं चक्रीवादळ ‘असानी’ अंदमान आणि निकोबार बेटांवर येऊन धडकलं आहे. त्यामुळे आज परिसरातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज असनी चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे किनारी भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
भारतीय हवामान विभागने माहिती दिली आहे की, दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र पूर्व आणि ईशान्येकडील सरकले आहे. रविवारी ते आणखी तीव्र झालं असून त्याचं चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ रविवारी अंदमान बेटावर धडकले असून बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस कोसळला.
‘असानी’ वादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकातील 150 जवानांचं पथक तैनात करण्यात आल्याचं आहे. नागरिकांच्या मदतीसाठी सहा कॅम्प तयार करण्यात आले आहेत. पोर्टब्लेअरमध्ये 68 जवानांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. तर दिगलीपूर, रगंत, हुतबै येथे 25 जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. उत्तर आणि मध्यम अंदमान आणि दक्षिण अंदमान जिल्ह्यासह पोर्ट ब्लेअरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.