मोदींच्या विधानावर हिंदू महासभेची नाराजी
![मोदींच्या विधानावर हिंदू महासभेची नाराजी](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/modi.jpg)
नवी दिल्ली |
पंजाबमधील घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर अखिल भारत हिंदू महासभेने नाराजी व्यक्त केली आहे. मोदींना ‘एसपीजी’ सुरक्षा व्यवस्था दिली गेली असताना, अत्याधुनिक शस्त्रांसह जवान तैनात केले असताना आणि जॅमर व सेन्सर लावलेली बॉम्बप्रतिरोधक कार असतानाही मोदींनी ‘मी जिवंत परत आलो’, असे विधान करणे योग्य नाही, अशी टीका हिंदू महासभेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र पांडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. ‘मोदी साहेब, आता तुमच्यावर आणखी कसा भरवसा ठेवणार सांगा’, अशी विचारणाही पांडे यांनी निवेदनात केली आहे.
राजशिष्टाचाराचा विचार न करता मोदी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भेटायला गेले होते. शरीफ यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी भेट वस्तूही दिल्या होत्या. तेच मोदी सुरक्षेसंदर्भात बोलत आहेत, अशी टिप्पणी पांडे यांनी केली. पंजाबमध्ये मोदींचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला. त्यामुळे मोदींना पुलावर १५ मिनिटे थांबावे लागले पण, त्या काळात सुरक्षा जवान आणि शेतकरी यांच्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार वा विसंवाद झालेला दिसला नाही. पण, पंजाबमधील घटनेला कोण जबाबदार आहे, हे लोकांसमोर आले पाहिजे व दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मत मांडत पांडे यांनी निवडणुकीच्या काळात होणाऱ्या जुमल्यांकडे अंगुलीनिर्देश केला.
- ‘राजकीय क्लृप्त्यांना बळी पडू नये’
मोदींना शारीरिक इजा पोहोचवण्याची मनीषा बाळगणाऱ्या लोकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची हत्या केली आहे. हत्येचा कट रचणारे प्रपोगंडा करत नाहीत. अवघा देश मोदींच्या पाठीशी आहे पण, राजकीय क्लृप्तय़ांना लोकांनी बळी पडू नये, असेही पांडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.