TOP Newsताज्या घडामोडी

गंभीर विषयांवरुन अन्य मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा सरकारचा डाव – डाॅ. नीलम गोऱ्हे यांची टीका

नाशिक : आपले गहू आपल्यालाच देऊ, अशी सध्या राज्य सरकारची स्थिती आहे. मागील सरकारच्या काळातील वेगवेगळ्या योजनांना स्थगिती देत त्याच योजना वेगवेगळ्या माध्यमातून आणल्या जात आहेत. वेदांता किंवा अन्य विषयावर बोलण्यापेक्षा सरकार वेगवेगळ्या विषयांकडे जनतेचे लक्ष विचलित करत आहे, अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. येथे मंगळवारी डाॅ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यासमोर शेतकरी आत्महत्या, वेठबिगारी यासह वेगवेगळे प्रश्न आहेत. मात्र सरकार याविषयी बोलण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर दार उघड बये ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून राज्यातील ६१ मंदिरांमध्ये दर्शन घेण्यात येणार आहे.

मंगळवारी चांदवडची रेणुका, बुधवारी वणीच्या देवीचे दर्शन घेणार आहे. या माध्यमातून जनतेच्या भावना जाणून घेत त्यांना सुरक्षितता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मंदिरांमधील सर्व प्रसाद शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना देणार आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत, इगतपुरी तालुक्यातील आदिवासींच्या वेठबिगारीचा प्रश्न समोर आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांकडून अहवाल मागितला असून अद्याप तो प्राप्त झालेला नाही. या घटनेमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी या सर्व प्रकरणाचा शोध घेण्यासाठी शीघ्र कृती दल गठीत करणे गरजेचे होते. या माध्यमातून आदिवासी, भटके-विमुक्त, आर्थिक दृष्टया मागास अशा बालकांचा शोध घ्यायला हवा, असेही डाॅ. गोऱ्हे यांनी सांगितले.

राज्यात वेदांता प्रकल्पावरून लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळ्या मुद्यांकडे लक्ष वेधले जात आहे. वेदांताविषयी राज्य सरकारचा करार झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी का गेले, असा प्रश्न गोऱ्हे यांनी उपस्थित केला. यावेळी झालेल्या चर्चेचा अहवाल जाहीर करण्याचे आव्हान त्यांनी दिले. सध्या त्र्यंबकेश्वर येथील डोंगर भुईसपाट केले जात आहेत. याविषयी कोणी बोलण्यास तयार नाही. छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीविषयी केलेले विधान असहिष्णु असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नंदुरबार पीडिता प्रकरणात पोलिसांवर दबाव
नंदुरबार जिल्ह्यातील पीडितेच्या प्रकरणात पोलिसांवर कोणाचा तरी दबाव आहे. पीडितेचा भ्रमणध्वनी पोलिसांनी जप्त केला. त्यामध्ये दृकश्राव्य फित असूनही संबंधितांवर कुठलाच गुन्हा दाखल झाला नाही. याबाबत पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्याशी संपर्क केल्यानंतर कार्यवाही सुरु झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही यासंदर्भात निवेदन दिले. मात्र त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. अशी अनेक प्रकरणे दबली जात असल्याची भीती गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

दसरा मेळावा

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी वेगवेगळे दावे केले जात असून हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जे नाखुश असतील त्यांना रस्ता मोकळा असल्याचे सांगितले आहे. आमच्या मेळाव्यात येणारी गर्दी ही स्वयंस्फुर्तीने होते. शिंदे गटाला इतका आत्मविश्वास असेल तर निवडणुका लढावी, मुंबई, नाशिकसह इतरत्रही शिवसेनाच विजयी होईल, असा दावा डाॅ. गोऱ्हे यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button