आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 जानेवारीपर्यंत बंदच राहणार
नवी दिल्ली – कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुर्ववत करण्यात येणार होती. मात्र, तेवढ्यात ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढल्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर बंधनं आली आहेत. DGCA ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
इंटरनॅशनल कार्गो संचालन आणि डीजीसीएद्वारे परवानगी दिलेल्या विमानसेवेवर हे लागू होणार नाही. त्याबरोबरच डीसीजीएने सांगितले की, आंतरराष्ट्रीय विमानसेवेतील अधिकाऱ्यांना काही मार्गांसाठी परवानगी देण्याची अनुमती देण्यात आली आहे. भारत सरकारने 14 देश वगळता इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 15 डिसेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली होती. परंतु ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव पाहता निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता. भारतात कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध लागू करण्यात आले होते. काही महिने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प होती. त्यानंतर ‘वंदे भारत’ विमान सेवा आणि कोव्हिड बबल नियमांनुसार, विमानसेवा सुरू करण्यात आली.
भारत सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या
भारत सरकारनंही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्या गाईडलाईन्सची अमलबजावणी आजपासून केली जाणार आहे. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणं अनिर्वाय असणार आहे. दक्षिण आफ्रिकेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना ज्यांना या व्हेरियंटची लागण झाली आहे त्यांना त्यांच्या स्थानिक वाणिज्य दूतावासांशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.