राज ठाकरेंच्या सुरक्षेवरून वाद; गृहमंत्र्यांनी केंद्र सरकारवर केला गंभीर आरोप
![Dispute over Raj Thackeray's security; Home Minister made serious allegations against the Central Government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Dispute-over-Raj-Thackerays-security-Home-Minister-made-serious-allegations-against-the-Central-Government.jpg)
नागपूर | राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘राज्यातील सर्व व्यक्तींचा सुरक्षा करण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून गमतीशीर घडामोडी घडत आहेत. ज्यांच्यावर आरोप आहेत किंवा ज्या व्यक्तींकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहे अशा व्यक्तींना सुरक्षा पुरवण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. राज्याच्या अधिकारांवर हे अतिक्रमण आहे,’ असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध प्रश्नांबाबत भाष्य केलं. मशिदीच्या भोंग्यांबाबतही निर्णय घेण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. ‘पोलीस महासंचालकांना राज्यभरातील पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांकडून ज्या सूचना येतील त्याआधारे दोन्ही बाजूचा विचार करून निर्णय घेतला जाईल. पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांची आणखी एक बैठक झाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ,’ अशी माहिती वळसे पाटलांनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम पोलीस प्रशासनाला दिल्याने राज्यात तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले की, राज्यात तणाव निर्माण होईल, असं मला वाटत नाही. आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत आणि कोणत्याही प्रकारे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.
दरम्यान, दोन समाजात तणाव निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्या संघटना किंवा व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असंही यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.