धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाह यांची भेट, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कमबॅक होणार? राजकीय वर्तुळात चर्चा

Dhananjay Munde : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात एका प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं अटक वॉरंट काढलं आहे. माणिकराव कोकाटे यांना त्यामुळे कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे त्याचवेळी आता धनंजय मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद या अटक वॉरंटमुळे धोक्यात आलं आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद धनंजय मुंडे यांना मिळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
धनंजय मुंडे यांची पोस्ट काय?
“आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री. अमित भाई शहा यांची भेट घेऊन परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे; त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली. पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची ही भेट होती.” अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी केली आहे.
हेही वाचा – प्रभाग १६ मध्ये महायुतीत जागावाटपाचा पेच
करुणा मुंडे यांचं म्हणणं काय?
माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाल्यानंतर ते दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यामुळे माझा देखील लढा सुरू राहणार आहे. धनंजय मुंडे हे लवकरच मंत्रिमंडळात कमबॅक करतील असं मला वाटतं आहे असं करुणा मुंडेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं. धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप आहेत, वाल्मिक कराड प्रकरणामुळेही त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते दिल्लीमध्ये गेले आहेत, असं मला वाटतं आहे. वाल्मिक कराड याला बाहेर काढण्यासाठी आणि या सगळ्यातून सुटका करून घेण्यासाठी आता हालचाली सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे धनंजय मुंडे हे दिल्लीला गेले आहेत. मी देखील शनिवारी याबाबत पत्रकार परिषद घेणार आहे असंही करुणा मुंडे म्हणाल्या.
माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या
दरम्यान मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत, त्यांच्याविरोधात न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलं आहे, त्यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून हाय कोर्टात देखील धाव घेतली होती, मात्र या प्रकरणावर कोर्टानं तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. आता या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे, त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे. याच घडामोडी राज्यात घडत असताना धनंजय मुंडेंनी घेतलेली अमित शाह यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.




