ओमिक्रॉनचा धोका! आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील निर्णय पुढे ढकलला
![Danger of Omicron! Decision on international flights postponed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/airoplain.jpg)
नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या घातक प्रकारामुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एकूण 19 देशात ओमिक्रॉनचा फैलाव झाल्याचे समजते आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारने 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा नियमित सुरु करण्याचा निर्णय आता पुढे ढकलला आहे. नवी तारीख कळेपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवर स्थगिती कायम राहणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
चारच दिवसांपूर्वी म्हणजे 26 नोव्हेंबरला केेंद्र सरकारने 14 देश वगळता इतर सर्व देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती. कोरोना महासाथ ओसरत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले गेले होते. त्याचदरम्यान कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या घातक प्रकाराने दक्षिण आफ्रिकेत धुमाकुळ घातला. त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी आफ्रिकेतून येणार्या हवाई वाहतुकीवर निर्बंध आणले होते. भारत सरकारनेही दक्षिण आफ्रिकेसह इतर देशांतून येणार्या विमानांवर बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींकडे केली होती. त्यानुसार आज केेंद्रीय हवाई वाहतूक विभागाने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे. संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील काळात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु केली जाईल, असे केेंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.