कोट्यवधी भाविकांचे श्रद्धा स्थान असलेली शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली
कामावर निघालेल्या साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृणपणे हत्या
शिर्डी : जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धा स्थान असलेली शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली आहे. साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहाटे कामावर जात असताना ही घटना घडली. शिर्डीत आणखी एका तिसऱ्या तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ला झालाय. तो सुद्धा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. भाजपचे या भागातील नेते आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच सांत्वन केलं. स्वत: घटनास्थळी जाऊन पाहाणी केली.
तीन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्याच्या या घटना घडल्या आहेत. चारच्या सुमारास घटना घडल्याने फार लोक जागे नव्हते. दोन बॉडीज वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्या. तिस-यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिर्डीत एकाचदिवसात पहाटेच्यावेळी तीन वेगवेगळ्या चाकू हल्ल्याच्या घटना होणं ही गंभीर बाब आहे. या घटनेमुळे शिर्डीत प्रचंड संताप आहे. स्थानिकांनी आरोपीं विरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हेही वाचा : किसान क्रेडिट कार्ड योजना नेमकी काय आहे?
त्या दोघांची नावं काय?
सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुळ यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. ते शिर्डी साई संस्थानमध्ये नोकरीला होते. सुभाष घोडे हे करडोबा नगर चौकाचे तर नितीन कृष्णा शेजुळ साकुरी शिवचे रहिवासी आहेत. रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या तिसऱ्या तरुणाचे नाव कृष्णा देहरकर असून त्याच्यावर श्रीकृष्ण नगर भागात हल्ला झाला.
स्थानिकांमध्ये संताप
हत्याकांडाला अपघात म्हटल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे. पोलिसांनी कारवाईत तत्परता दाखवली नाही असं स्थानिकांच म्हणणं आहे. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येत असतात. शिर्डीमध्ये नेहमी भक्तांची गजबज असते. त्या भागात अशा प्रकारे हत्या होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे.
कोणावर संशय?
नशेखोराने हे कृत्य केल्याचा संशय आहे. एक संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शिर्डीत गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत चालल्याच दिसून येतय. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याच या घटनेतून दिसून आलय.