#CoronaVirus: WHO ला लाज वाटली पाहिजे, चीनची PR एजन्सी असल्यासारखा कारभार, ट्रम्प यांचा हल्लाबोल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/trump.jpg)
करोना व्हायरसच्या संकटासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेला जबाबदार धरले आहे. ते सातत्याने या दोघांना लक्ष्य करत आहेत. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक आरोग्य संघटनेवर हल्लाबोल केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेला स्वत:ची लाज वाटली पाहिजे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
करोना व्हायरसचा होणारा फैलाव आणि त्याचे परिणाम WHO ने वेळीच लक्षात आणून दिले नाहीत असा ट्रम्प यांचा आरोप आहे. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी सुद्धा बंद केला आहे. करोना व्हायरसच्या संकटात WHO ने नेमके काय काम केले? त्यांची भूमिका काय होती? त्याची चौकशी ट्रम्प प्रशासनाने सुरु केली आहे. “जागतिक आरोग्य संघटना चीनसाठी पब्लिक रिलेशन एजन्सी असल्यासारखे काम करत आहे. त्यांना स्वत:ची लाज वाटली पाहिजे” अशा शब्दात ट्रम्प यांनी WHO वर हल्लाबोल केला. व्हाइट हाऊसच्या इस्ट रुममध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.
अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला वर्षाला ५० कोटी डॉलरचा निधी दिला जातो. तेच चीनकडून वर्षाला फक्त ३८ लाख डॉलर्स दिले जातात याचा पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला. “लोक भयंकर चुका करतात तेव्हा त्यांनी कुठल्याही सबबी किंवा कारणे देऊ नयेत. त्या चूकांमुळे लाखो लोक आपले प्राण गमावत आहेत. माझ्या मते जागतिक आरोग्य संघटनेला स्वत:ची लाज वाटली पाहिजे” असे ट्रम्प म्हणाले.