#CoronaVirus: मुंबई, पुणे, मालेगाव येथून चंद्रपूरमध्ये आलेले चारजण कोरोनाबाधित
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण १९ झाली आहे. काल रात्री उशिरा आणखी चार अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे २३ मे रोजी रात्री १५ पर्यंत पोहोचलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मध्यरात्री नंतर वाढून १९ झाली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार २३ मे रोजी रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी दोन रुग्ण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आहेत. तर दोन रुग्ण संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत.
यामध्ये मुंबईवरून आलेल्या मौजा वरवट येथील 25 वर्षीय युवकांचा समावेश आहे. हा युवक 17 मे रोजी अन्य सहा लोकांसोबत मुंबईवरून चंद्रपूर येथे आला होता. या युवकाला संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. 22 मे रोजी त्याचा स्वॅबचा नमुना घेण्यात आला होता. तर, घुगुस येथील 25 वर्षीय महिला 14 मे रोजी पुण्यावरून आली होती. यानंतर ती होम क्वारंटाइन होती. मात्र लक्षणे दिसून आल्यामुळे 22 मे रोजी ती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाली. 22 रोजी या महिलेचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. नाशिक मालेगाव येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील मूल तालुक्यातील चिरोली येथील २७ वर्षीय व्यक्तीला संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या युवकाचा स्वॅबचा नमुना 22 मे रोजी घेण्यात आला होता. तर, पुण्यावरून आलेल्या 28 वर्षीय दुर्गापूर येथील युवक होम क्वारंटाइन होता. त्यानंतर 21 मे रोजी लक्षणे दिसून आल्यामुळे तो वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झाला होता. 22 मे रोजी या युवकाचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. यानंतर या चारही जणांचे स्वॅबचे नमुने पॉझिटीव्ह आले.
सध्या १९ पैकी १८ रुग्ण चंद्रपूरमध्ये आहेत. पाहिला रूग्ण करोनामुक्त झाला आहे. चंद्रपूरमध्ये २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) आणि २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) या चार तारखांना आतापर्यंत १९ रुग्ण पॉझिटीव्ह ठरले आहेत.