#CoronaVirus: मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णाचा डॉक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/coronavirus-75-2.jpg)
करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला आहे. मुंबईच्या वोक्हार्ट रुग्णालयात हा प्रकार घडला असून ३४ वर्षांच्या डॉक्टरवर एका ४४ वर्षाच्या करोनाग्रस्त पुरुष रुग्णाने हा आरोप केलाय. आरोपी डॉक्टरविरोधात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.मात्र, आरोपी डॉक्टरही करोनाग्रस्त असल्याच्या संशयामुळे पोलिसांनी अद्याप डॉक्टरला अटक केलेली नाही. त्या डॉक्टरला ठाणे येथील त्याच्या राहत्या घरातच क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती आग्रीपाडा पोलिसांनी दिली आहे.
वृत्तानुसार, एक मे रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे आरोपी डॉक्टरचा तो कामावरील पहिलाच दिवस होता. त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे ३० एप्रिल रोजीच हा डॉक्टर रुग्णालयात रुजू झाला होता.दरम्यान, त्या डॉक्टरला तातडीने निलंबित करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
रुग्णालय प्रशासनाने केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरोधात आयपीसी कलम ३७७, २६९ आणि २७० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ‘एक मे रोजी १० व्या मजल्यावरील आयसीयूमधील रुग्णाच्या रुममध्ये आरोपी डॉक्टर गेला. त्यानंतर आरोपी डॉक्टरने रुग्णासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याचा रुग्णाने विरोध केला आणि जवळील अलार्म वाजवला. त्यानंतर रुमबाहेर असलेले कर्मचारी तातडीने आतमध्ये आले’, असे तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी, “आम्ही गुन्हा दाखल केलाय पण अद्याप डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही. रुग्णाशी जवळून संपर्क आल्यामुळे डॉक्टरलाही करोनाची लागण झाल्याचा संशय आहे”, अशी माहिती आग्रीपाडा पोलिस स्थानकाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी दिली. करोनाग्रस्त असल्याच्या संशयामुळे आरोपी डॉक्टरला ठाणे येथील त्याच्या राहत्या घरीच क्वारंटाइन करण्याच आल्याची, माहिती पोलिसांनी दिली आहे.