#CoronaVirus: धक्कादायक! मास्क न घालता घराबाहेर पडल्याने झाला वाद; पित्यानेच केली दिव्यांग मुलाची हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/H58c28bae650947c28afaed42cec9024fN.jpg_300x300.jpg)
करोना संसर्ग होण्याची भिती लोकांमध्ये इतकी वाढली आहे की कोलकात्यामध्ये मास्क न घालण्यावरुन झालेल्या वादातून एका पित्याने आपल्या दिव्यांग मुलाची हत्या केली. उत्तर कोलकात्यामधील एक दिव्यांग मुलगा मास्क न घालताच घराबाहेर पडला. यावरुन त्याच्या वडीलांना त्याला सुनावले. यावरुनच दोघांमध्ये बाचाबाची झाली. संतापलेल्या पित्याने रागाच्याभरात मुलाचा गळा दाबून त्याची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकरणात ७८ वर्षीय बंशीधर मल्लिक या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बंशीधर हे त्यांच्या दिव्यांग मुलगा सिरशेंदू मल्लिक याच्याबरोबर राहत होते. शनिवारी संध्याकाळी ४५ वर्षीय सिरशेंदू मास्क न घालताच घराबाहेर पडला. यावरुन पिता-पुत्रामध्ये बाचाबाची झाली. ज्यानंतर बंशीधर यांनी सिरशेंदूचा गळा दाबून हत्या केली. आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्याची जाणीव झाल्यानंतर बंशीधरने पोलीस स्थानकात जाणून स्वत: गुन्हा कबूल केला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सायंकाळी सात वाजता बंशीधर श्यामपुकुर पोलीस स्थानकामध्ये आला. “मी साडेपाच वाजता माझ्या मुलाची हत्या केली असं त्याने पोलिसांना सांगितलं. घरातील एका कापडाने मी माझ्या दिव्यांग मुलाची गळा दाबून हत्या केली,” अशी कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलीस त्याच्या घरी पोहचले असता मृतदेह घरातच अढळून आला.
बंशीधर एका खासगी कंपनीमधून निवृत्त झाले होते. त्यांचा मुलगा बेरोजगार होता. दोघांमध्ये नेहमी लहान मोठ्या कारणांवरुन वाद व्हायचे. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. सिरशेंदु मास्क न लावताच घराबाहेर जात असल्याने बंशीधर यांनी त्याला अनेकदा बजावले. मात्र शनिवारी दोघांमध्ये याच विषयावर बाचबाची झाली. त्यातूनच ही हत्या झाली. पश्चिम बंगालमध्ये १२ मार्चपासून घराबाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक केलं आहे.