breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: “डॉक्टर, पोलीस मदत करतात तर मी पण करणार”; ८० वर्षीय हमाल मजुरांना देतोय मोफत सेवा

देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्चपासून सुरु असणाऱ्या लॉकडाउनचा पाचवा टप्पा १ जूनपासून सुरु झाला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जागोजागी अडकलेल्या स्थलांतरितांसाठी रेल्वेने श्रमिक विशेष गाड्या चालवण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउनच्या घोषणेनंतर हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल झाले. अनेकांनी चालत आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला असं असतानाच श्रमिक विशेष गाड्यांच्या माध्यमातून या मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र लखनौजवळील चारबाग रेल्वे स्थानकावर पोहचणाऱ्या या स्थलांतरित मजुरांना तेथे आणखीन एक सुखद धक्का देत आहेत ते ८० वर्षीय हमाल असलेले मुजिबुल्ला. मुजिबुल्ला हे स्थलांतरितांचे सामान मोफत वाहून नेत त्यांची आगळ्यावेगळ्या पद्धतीने सेवा करत आहेत.

वयाच्या ८० व्या वर्षीही मुजिबुल्ला हे दिवसातील आठ ते दहा तास काम करतात. मी एका वेळेस डोक्यावर ५० किलो वजन उचलू शकतो असं मुजिबुल्ला सांगता. सध्या ते देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून चारबाग रेल्वे स्थानकात दाखल होणाऱ्या स्थलांतरित मुजरांचांना मोफत सेवा देत आहेत. याला ते ‘खिदमत’ असं म्हणतात. मजुरांची सेवा करणे हे आपलं कर्तव्य असून ते खूप महत्वाचे आहे असं मुजिबुल्ला सांगतात. मोफत सामान वाहून नेण्याबरोबरच ट्रेनमधील प्रवाशांना अन्न आणि पाण्याच्या बाटल्या देण्याचे कामही मुजिबुल्ला करतात. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पैसा कमावता येईल सध्या या मजुरांची सेवा करणे गरजेचे आहे असं मुजिबुल्ला सांगतात.

“अनेक लोकं करोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये आपले योगदान देत आहेत. यामध्ये पोलीस आणि डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यामुळेच मी दिवसातील आठ ते दहा तास या मजुरांच्या सेवेसाठी देतो,” असं आपल्या सेवेसंदर्भात बोलताना मुजिबुल्ला सांगतात.

मुजिबुल्ला हे स्वच्छतेच्या बाबतीही सतर्क आहेत. “सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे हे अत्यंत महत्वाचे आहे. कोणाही वाटेल तिथे थुंकले नाही पाहिजे. ठिकठिकाणी त्यासाठी सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कोणी उघड्यावर थुंकत असेल तर मी त्या व्यक्तीला शौचालय कुठे आहे हे दाखवतो,” असं मुजिबुल्ला सांगतात.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही पत्र पाठवून मुजिबुल्ला यांचे कौतुक केलं आहे.

मुजिबुल्ला यांच्या कामासंदर्भातील पोस्ट सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्या असून अनेकजण त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. “ही अशी लोकं खऱा आदर्श असतात.त्यांचा केवळ मानवतेवर विश्वास असतो,” असं इन्टाग्रामवरील एका युझरने म्हटलं आहे. तर दुसऱ्या व्यक्तीने “अशा लोकांमुळे माणुसकी टिकून आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button