#CoronaVirus: चिंताजनक! 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या ४५ हजारांहून अधिकने वाढली
![# Covid-19: 21,821 new corona infections diagnosed in 24 hours in India, 299 deaths](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto-3.jpg)
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा देशात दिवसागणित वाढतच चालेला आहे. परिणामी आरोग्य यंत्रणांवर याचा प्रचंड ताण आलेला आहे. सर्वतोपरी कोरोनाला आळा घालण्यासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय योजले जात असतानाही भारतात कोरोना रुग्णांचा झपाट्यानं वाढणारा आकडा मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मागील चोवीस तासांमध्ये देशातील कोरोना रुग्णसंख्येत तब्बल ४५,७२० इतक्या संख्येनं वाढ झालेली आहे. कोरोना रुग्णांमध्ये नव्यां वाढ होण्याचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आणि तितकाच चिंता वाढवणारा ठरत आहे.
४५ हजारांपेक्षाही अधिक संख्येने कोरोना रुग्ण वाढल्यामुळं आता भारतात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा १२ लाखांच्याही पलीकडे पोहोचला आहे. इतकंच नव्हे, तर गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनामुळं प्राण गमावलेल्यांची संख्याही ११२९ इतकी झाली आहे. आतापर्यंतचा मृतांचा हा सर्वाधिक मोठा आकडा ठरत आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांविषयी सांगावं तर, आतापर्यंत देशात १२,३८,६३५ कोरोनाबाधित आढळलेले आहेत. यामध्ये ४,२६,१६७ रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत. तर, ७,८२,६०६ रुग्णं कोरोनातून सावरले आहेत. देशभात कोरोनामुळं २९,८६१ रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.