#CoronaVirus: कोरोनाची साथ वुहानमध्ये ऑगस्टमध्येच सुरू झाल्याचा संशय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/IMG-20200608-WA0035.jpg)
चीनमधील वादग्रस्त वुहान शहरात करोनाचा प्रसार हा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच सुरू झाला होता असे उपग्रह प्रतिमांच्या माध्यमातून सांगण्यात आले. या काळात प्रमुख रुग्णालयांबाहेर वाहनांची मोठी रांग लागलेली दिसत आहे. याशिवाय सर्च इंजिनमध्ये डायरिया, कफ या शब्दांचा शोध घेतला गेल्याचे दिसत आहे.
हार्वर्ड मेडिकल स्कूल, बोस्टन युनिव्हर्सिटी ऑफ पब्लिक हेल्थ व बोस्टन चिल्ड्रेन हॉस्पिटल यांनी जे संशोधन केले ते उपग्रह प्रतिमांवर आधारित असून जानेवारी २०१८ ते एप्रिल २०२० दरम्यानच्या प्रतिमांचा वापर त्यात करण्यात आला होता. या काळात ऑगस्ट २०१९ मध्ये रुग्णालयांबाहेर पार्किंगमध्ये गाडय़ांची संख्या वाढलेली दिसते ती डिसेंबर २०१९ मध्ये खूपच वाढली होती.
सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात पाच ते सहा रुग्णालयांच्या बाहेर मोटारींची गर्दी जास्त होती. वुहानमध्ये म्हणजे दक्षिण चीन भागात हा विषाणू खूप आधीपासून होता यावर त्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. तापाच्या दुसऱ्या कुठल्याही मोसमात कफ व डायरिया या शब्दांचा शोध सर्च इंजिनवर घेतला गेला नव्हता.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी हे संशोधन खोडसाळपणाचा असल्याचे म्हटले असून वाहनांच्या संख्येवरून असा निष्कर्ष काढणे हे शास्त्रीय पद्धतीत बसत नाही. तो अभ्यास नेमका काय आहे ते आपण पाहिलेले नाही पण त्यात काही तथ्य नाही हे त्यातील जो तपशील कानावर आला आहे त्यातून सूचित होत आहे.
संशोधनात असे म्हटले होते की, चीनच्या बायडू या सर्च इंजिनमध्ये कफ व डायरिया या शब्दांचा शोध तीन आठवडे घेतला जात होता हा काळ २०२० मध्ये निश्चिात रुग्ण सापडण्याच्या तीन आठवडे आधीचा आहे. कफ व डायरिया हे शब्द कोविड १९ च्या लक्षणाशी संबंधित आहेत. ऑगस्ट महिन्यातच या शब्दांचा शोध मोठय़ा प्रमाणात घेण्यात आला होता. कोविड १९ साथ चीनमध्ये डिसेंबरच्या अखेरीस सुरू झाली असे सांगितले जात असले तरी ती खूप आधीच सुरू झाली होती. या साथीत जगात ४ लाख बळी आता गेले असून चीनने वेळीच माहिती न दिल्याचा आरोप आहे.
संशोधनाशी संबंधितांनी म्हटले आहे, रुग्णालयाच्या पार्किगमधील वाहनांची संख्या वाढली याचा अर्थ करोना विषाणू तेव्हापासून सुरू झाला यावर शिक्कोमोर्तब झाले, असा आमचा दावा नाही पण तरी वुहानमध्ये इन्फ्लुएंझाचा मोसम सुरू झाला होता तसेच डिसेंबरमध्ये तेथील शाळांना फ्लूच्या तापामुळे वर्ग बंद करावे लागले होते. हनान येथील सागरी अन्न बाजारपेठेच्या प्रकरणाआधीच करोनाचा प्रसार झाला होता असे आणखी एक संशोधन अलीकडेच आले असून त्याला दुजोरा देणारे हे संशोधन आहे.