#CoronaVirus | औरंगाबादेत निवासी डॉक्टरांचं कामबंद आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Aurangabad-doctor.png)
औरंगाबाद | निवासी डॉक्टरांचं औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात आंदोलन सुरु आहे. तीन महिन्यांपासून पगार थकल्यामुळे निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. निवासी डॉक्टरांचं वैद्यकीय अधिक्षक कार्यालयासमोर निदर्शने सुरु आहेत. त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनाविरोधात डॉक्टरांची घोषणाबाजी सुरु आहे.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 490 निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांपासून पगार थकले आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टर आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. तीन महिन्यांच्या पगार तातडीने द्या, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह विदर्भातून रुग्ण येतात. या रुग्णांवर निवासी डॉक्टरांकडून उपचार केला जातो. आंदोलन करणाऱ्यांपैकी बरेचसे डॉक्टर कोरोना रुग्णांवरदेखील उपचार करत आहेत. तर काही डॉक्टर इतर आजारांवर उपचार करत आहेत.
कोरोना संकटकाळात स्वत:ची धोक्यात टाकून डॉक्टरांकडून रुग्णसेवा सुरु आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून घाटी रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांना पगार मिळाला नाही. याआधी डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, रक्कम जमा झाली असून लवकरच पगार होईल, असं आश्वासन देण्यात आलं. मात्र, अद्यापही डॉक्टरांचा पगार झालेला नाही.