#CoronaVirus: आयुक्त दीपक कासार यांचा तिसरा अहवालही नकारात्मक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/corona-patient-1-1.jpg)
महानगरपालिकेचे आयुक्त दीपक कासार यांची तिसऱ्यांदा केलेली चाचणीदेखील नकारात्मक आली आहे. अलगीकरणाचे काटेकोर पालन, योग्य सकस आहार, पुरेसा व्यायाम,औषधे आणि सकारात्मक विचार या पंचसूत्रीचे पालन केल्यानेच आपण करोनावर मात करू शकलो, अशी प्रतिक्रिया कासार यांनी दिली आहे.
कोणताही त्रास नसतांना केवळ खबरदारीचा उपाय म्हणून कासार यांनी करोना चाचणीसाठी स्त्राव दिला होता. १३ मे रोजी आरोग्य मंत्री डॉ.राजेश टोपे यांनी करोनासंदर्भात आढावा घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीतच कासार हे करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. बैठकीतून लगेच पडत कासार यांनी स्वत:ला घरात अलगीकरण करून घेतले होते.चार दिवसात त्यांनी पुन्हा चाचणी करून घेतली असता नकारात्मक अहवाल आला. गुरुवारी आयुक्तांनी पुन्हा तिसऱ्यांदा चाचणी केली असता त्याचाही नकारात्मक अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे आयुक्त हे करोनामुक्त झाल्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. संपूर्ण मालेगाव करोनामुक्त होईल, त्याच दिवशी खरा अत्यानंद होईल, असे कासार यांनी नमूद केले.
आजच्या घडीला मालेगावमध्ये करोनाग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी सर्वांनी नियमांचे पालन करून पुरेशी काळजी घेतल्यास या आजारावर शंभर टक्के मात करता येईल आणि शहर करोनामुक्त होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.