#CoronaVirus : आमची सुटका करा! फिलीपीन्समधल्या भारतीय विद्यार्थ्यांची मोदी सरकारकडे कळकळीची विनंती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Modia.jpg)
आमची सुटका करा, करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आम्हाला या संकटातून सोडवा अशी आर्त हाक फिलीपीन्समधल्या मनिला येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे. सध्या फिलीपीन्समध्ये २ हजार भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. त्यापैकी सुमारे २५० विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत असंही समजतं आहे. सिमरन गुप्ते या विद्यार्थिनीने यासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात मनिला आणि फिलीपीन्समध्ये काय स्थिती आहे हे विशद केलं आहे. सिमरन गुप्ते आणि तिची बहीण सानिया गुप्ते या दोघीही फिलीपीन्समध्येच अडकल्या आहेत.
काय म्हटलं आहे सिमरन गुप्तेने?
“मी सिमरन गुप्ते आणि माझी बहीण सानिया आम्ही दोघीही फिलीपीन्स येथील लास पिनास येथील मनिला मध्ये राहतो. आम्ही शिक्षणासाठी इथे आलो आहोत. वैद्यकीय विषयाचं शिक्षण हे आम्ही येथील University of Perpetual Help System Dalta , Las Pinas campus मध्ये घेत आहोत. मात्र मला एक मुद्दा प्रकर्षाने या ठिकाणी मांडायचा आहे तो आहे की या ठिकाणी करोनाग्रस्तांची संख्या २३० झाली आहे. तर करोनाची लागण झाल्याने १७ जणांचा मृत्यू झाला आहे. आम्ही साधारपणे २ हजार विद्यार्थी या ठिकाणी अडकून पडलो आहोत. या २ हजार विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २५० विद्यार्थी हे महाराष्ट्रातील आहेत. आम्ही १८ आणि १९ मार्च रोजी भारतात येण्यासाठीची विमानाची तिकिटं बुक केली होती. कारण फिलीपीन्स सरकारने आम्हाला ७२ तासांमध्ये देश सोडण्याची मुभा दिली होती. मात्र भारत सरकारने १७ मार्चला एक आदेश काढला ज्यानुसार ३१ मार्च पर्यंत १२ देशांमधल्या प्रवाशांना येण्यास मज्जाव केला आहे. फिलीपीन्स ब्लॅक लिस्टेड झाले आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी अडकून पडलो आहोत.”