काँग्रेसमध्ये खांदेपालट : हर्षवर्धन सपकाळ नवे प्रदेशाध्यक्ष!
राजकारण: अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
![Congress, Congress, Rajya Sabha, Harsh Vardhan, Sapkal, Nave, State President,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/sakpal-780x470.jpg)
नवी दिल्ली: सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेस पक्षाची नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्ती केली आहे. याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे यांनी विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यासही मान्यता दिली आहे. याबाबत अखिल भारतीय काँग्रेस समितीच्य अधिकृत एक्स अकउंटवर माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस समितीने एक पत्रक जारी केले असून, त्यामध्ये म्हटले आहे की, “काँग्रेस अध्यक्षांनी हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी तात्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे. मावळते अध्यक्ष नाना पटोले यांच्या योगदानाचे पक्ष कौतुक करतो. याचबरोबर काँग्रेस अध्यक्षांनी महाराष्ट्रातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून विजय नामदेवराव वडेट्टीवार यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने करण्यास मान्यता दिली आहे.”
हेही वाचा : आता रुग्णांना मिळणार ‘विशेष’ ओळख, रुग्णालयांना ‘युनिक आयडी’द्वारे मिळवता येणार माहिती
कोण आहेत हर्षदर्धन सपकाळ?
गांधी कुटुंबीयांशी जवळचे संबंध असलेले हर्षवर्धन पाटील २०१४ ते २०१९ या कालावधीत बुलधाना विधानसभा मतदारसंघाचे सदस्य होते. त्यांनी बुलढाना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. याचबरोबर गेल्या काही काळात त्यांनी पक्षासाठी राष्ट्रीय स्तरावरही काम केले असून, अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी विविध भूमिका पार पाडल्या आहेत.
अखेरच्या क्षणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब
विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नवा प्रदेशाध्यक्ष कोण? याबाबत काँग्रेस वर्तुळात मोठी चर्चा सुरू होती. यामध्ये बंटी उर्फ सतेज पाटील, विश्वजीत कदम आणि विजय वडेट्टीवार यांच्या नावची चर्चा होती. मात्र, अखेरच्या क्षणी विदर्भातील चर्चेत नसलेले पण पक्षनिष्ठा आणि राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क असलेले हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव पुढे आले. त्यांच्या नावावर एकमत झाल्यानंतर आज सकपाळ यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. दरम्यान सपकाळ यांनी निवडीनंतर विजय वडेट्टीवार यांनी, त्यांना संधी मिळाली असती तर ती उत्तमपणे पार पाडली असती, असे म्हटले आहे.