CM उद्धव ठाकरेंवर टीका; आव्हाड-शेलारांमध्ये जुंपली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/ahwad.jpg)
मुंबई | महाईन्यूज
नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का?, अशी जळजळीत टीका भाजपचे नेते आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली आहे. शेलार यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. नालासोपाऱ्यातील एका कार्यक्रमात शेलार यांनी ही टीका केल्यानंतर या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतलेला आहे.
नालासोपारा येथील एका कार्यक्रमात भाजप नेते आशीष शेलार यांनी सीएएवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले नागरिकत्व संशोधन कायदा लागू न करायला हे राज्य का तुमच्या बापाचं आहे का?, अशा शब्दात शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. या टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला असून आशीष शेलारांना हे वक्तव्य शोभत नाही. भाजपच्या हातातून सत्ता निसटल्याने भाजप अस्वस्थ आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आशीष शेलार जर बाप काढत असतील तर आम्ही गुजरातमध्ये जाऊन बापाचा शोध घेत नाही, अशा शब्दांत आव्हाड यांनी आशीष शेलार यांना प्रत्युत्तर दिलेले आहे. दरम्यान, मी कुणावरही वैयक्तीक टीका केली नाही, असे स्पष्टीकरण आशीष शेलार यांनी दिलेले आहे.