रिक्षा, टॅक्सी मीटरमधील बदलास आजपासून सुरुवात
![Change in rickshaw, taxi meter starting from today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/mv-taxi-780x470.jpg)
मुंबई : मुंबई महानगरात रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली. मात्र सुधारित भाडे दरासाठी रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल करावे (रिकॅलिब्रेशन) लागणार असल्याने १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबपर्यंत बदल करण्याच्या सूचना चालकांना करण्यात आल्या होत्या; परंतु मीटरमधील चिपची सुधारणा, चाचणी, तपासणी करण्यासाठी उत्पादकांकडूनच विलंब झाल्याने मीटर बदल प्रक्रिया रखडली होती. मात्र मीटर बदल प्रक्रिया बुधवारपासून सुरू होणार असल्याची माहिती परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, मीटरचे रिकॅलिब्रेशन होईपर्यंत क्यूआर कोड असलेले सुधारित अधिकृत भाडेदर तक्ता संघटनांमार्फत चालकांना घेण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु मुंबईत काही रिक्षा, टॅक्सीचालक मीटरमध्ये बदल न होताच आणि क्यूआर कोड नसलेले भाडेदर तक्ता दाखवून नवीन भाडे आकारणी करत आहेत.
रिक्षाचे भाडे दोन रुपयांनी, तर टॅक्सीच्या भाडय़ात तीन रुपयांनी वाढ करण्यावर मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. १ ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी केली. त्यामुळे रिक्षाचे सध्याचे दीड किलोमीटर या पहिल्या टप्प्याकरिता असलेले किमान भाडे २१ रुपयांऐवजी २३ रुपये, तर टॅक्सीचे भाडे २५ रुपयांहून २८ रुपये झाले. कूल कॅबचेही भाडेदर महागले आणि सध्या दीड किलोमीटरसाठीचे किमान भाडे ३३ रुपयांऐवजी ४० रुपये झाले. नवीन भाडेदर आकारणीसाठी रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल करावे (रिकॅलिब्रेशन) लागणार असल्याने १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबपर्यंत बदल करण्याच्या सूचना करण्यात आल्या. हे बदल करण्यासाठी मीटरमध्ये एक चिप बसवण्यात येते; परंतु मीटरमधील विविध चाचण्यांमुळे उत्पादकांकडून ही प्रक्रिया काहीशी लांबली. परिणामी मुंबई महानगरात रिक्षा-टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल झाले नाहीत आणि नवीन भाडे आकारणीही होऊ शकली नाही. मीटर बदलाची ही प्रक्रिया १२ ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याची माहिती परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.