बीडमधील वणव्यात प्राजक्ताची होरपळ !
![Beed, Vanwa, Prajakta, Horpal,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/prajakta-780x470.jpg)
बीडमध्ये जो काही वणवा पेटला आहे, तो माणूसकीला नक्कीच शोभेसा नाही. मुळात एखाद्याचा अमानुषपणे खून होणे, ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पण, त्याचे भांडवल करून एकमेकांच्या अब्रूची लक्तरे बीडच्या वेशीवर टांगण्याचे नवीन धंदे सुरू झाले आहेत. या प्रकरणाचा तपास होईल, त्यातील सत्य बाहेरही येईल, पण तोपर्यंत आंदोलने करून, मोर्चे काढून एकमेकांवर जी चिखलफेक सुरू आहे, ती महाराष्ट्रासाठी नक्कीच भूषणावह नाही. तसं पाहिलं तर आणि या प्रकरणाच्या तळापर्यंत शोध घेतला तर हा वणवा पेटला आहे तो मराठा समाज विरुद्ध ओबीसी यांच्यात ! मराठा समाजाचे नेते याविषयी अनेक उलट-सुलट वक्तव्ये करून हा प्रश्न आणखीच चिघळवत आहेत, हे सकृतदर्शनी दिसत आहे आणि मुख्य म्हणजे या प्रकरणाचा तपास सुरू असल्यामुळे त्याबाबत टिप्पणी करणे किंवा अकलेचे तारे तोडणे पूर्णपणे चुकीचे आहे. परंतु, मराठा समाजाच्या उन्नतीचा ठेका घेतलेले काही दलाल घटनास्थळी जातात आणि भडकवणारे वक्तव्य करतात, हे प्रथम बंद व्हायला पाहिजे !
प्राजक्ता माळीचा संबंध काय ?
खून प्रकरणासंदर्भात आरोप प्रत्यारोप होणे, हे एक वेळ मान्य करू या. पण, भारतीय जनता पार्टीच्या सुरेश धस या आमदाराने विनाकारण अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेऊन हा विषय आणखी भरडत ठेवला आहे. बरं, प्राजक्ताचे नाव खून प्रकरणात नाही, तर ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ शी जोडून त्यांनी द्राविडी प्राणायाम केला आहे. प्राजक्ता माळी यांचे नाव घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना बदनाम करायचे आहे, हे सर्वजणच जाणतात, हे लक्षात घेऊ या.
मराठा विरुद्ध ओबीसी समाजाच्या या वणव्यामध्ये प्राजक्ता माळीची मात्र होरपळ झाली आहे, हे नक्की. काल तिने पत्रकार परिषद घेऊन बऱ्यापैकी खुलासा केला असला तरी आरोपांची जखम खुलाशाच्या मलमाने बरी होत नाही, हा तर समाज माध्यमांचा पाया आहे !
आरोपांची अत्यंत खालची पातळी
अत्यंत संवेदनशील अभिनेत्री प्राजक्ता माळीला एखाद्या आरोपाबाबत खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागणे, हे केवळ एकमेव प्राजक्ता माळीचे दुर्दैव नाही, तर आपल्या राजकारणाचे आणि पत्रकारितेचेही दुर्दैव आहे. राजकारणी आजकाल बोलताना संयम पाळत नाहीत. सुरेश धस या आमदाराने आपल्याजी काही मुक्ताफळे उधळली, त्यामुळे प्राजक्ता माळीचे व्यथित होणे स्वाभाविक होते. सुरेश धस यांनी केलेले वक्तव्य अत्यंत हीन आणि खालच्या पातळीवरील शकुनीच्या दर्जाचे होते. सुरेश धस यांची मानसिकता तर अत्यंत हीन दर्जाची होती. स्त्री ही कुठलीही असो, तिच्या अब्रूची लक्तरे अशा भाषेत बाहेर काढणे, हे कोणाही महिलेसाठी अत्यंत क्लेशदायक असते. सुरेश धस ज्या पद्धतीने महिलांच्या बाबतीत बोलले, तसे पुरुषांच्या बाबतीत का नाही बोलले? हा प्रश्न आहे. पुरुषांची अब्रू ..अब्रू असते आणि स्त्रीची अब्रू.. अब्रू नसते काय? सुरेश धस यांनी सत्ताधारी पक्षाचा एक जबाबदार आमदार असताना असले अत्यंत हीन दर्जाचे सडकछाप वक्तव्य अजिबात केले नसते. धस यांनी बोलता बोलता जी काही मुक्ताफळे उधळली आहेत, त्यामुळे संपूर्ण समाज माध्यमांना एकदम जोर चढला असून त्यांच्या लेखणीला किंवा हातात असलेल्या ‘बूम’ ला एकदम फार चढली आहे.
कलावंत असणे चूक आहे का ?
कलावंतांना कलावंत म्हणून जी भूमिका पार पाडावी लागते. त्या भूमिकेचा आणि त्यांच्या एकूण वर्तनाचा वाटेल तसा अर्थ काढणे. हे अत्यंत चुकीचे आहे. या प्रकरणात प्राजक्ता माळीबरोबर त्यांची आई होती, त्यांचा भाऊ होता. त्या सर्वांच्या चेहऱ्यावर असलेली उदासी अगदी स्पष्टपणे दिसत होती. आपली आई हे वक्तव्य ऐकल्यापासून झोपलेली नाही, असे प्राजक्ताने सांगितले. आपल्या प्रतिभावान आणि यशस्वी मुलीच्या बाबतीत एका आईने हळवे होणे, अत्यंत स्वाभाविक आहे. महिलेची अब्रू काचेसारखी असते. एकदा तडा गेला तर काय होईल, हे सांगता येत नाही. सुरेश धस यांनी आपल्या विधानाबद्दल माझी माफी मागावी, अशी साधी विनंती प्राजक्ता माळीने केली होती. त्यावर सुरेश धस यांनी निर्लज्जपणे आपण माफी मागणार नाही, असे म्हणणे म्हणजे हा हलकटपणाचा कळस आहे. जनतेने तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिले आहे. तुम्ही खूप दमदार आहात, म्हणजे तुम्हाला वाटेल तसे बोलण्याचा परवाना मिळालेला नाही. प्राजक्ता माळीची आतापर्यंतची कारकीर्द अतिशय यशस्वी आहे. प्राजक्ताच्या वागण्यातील अदब तसेच अनेक नामवंत कलावंतांसोबत फिल्मी दुनियेत राहूनही आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे कौशल्य आणि कसब सर्वांनाच ठाऊक आहे. कलावंतांना अनेकदा अनेक ठिकाणी जावे लागते. अनेक कार्यक्रम करावे लागतात,अशा एखाद्या कार्यक्रमात कोणी सत्कार केला आणि त्याचे फोटो काढल्यावर, त्यातून भलत्याच मानसिकतेने भलतेसलते अर्थ शोधून काढणे आणि त्यावरून चारित्र्यहनन करणे हा प्राजक्ता म्हणते त्याप्रमाणे गुन्हाच आहे, हे निक्षून सांगावेसे वाटते.
प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन आपली व्यथा मांडली. सुरेश धस भाजपाचे आमदार असल्यामुळे त्यांच्याबाबत फडणवीस हे काय भूमिका घेतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यानच्या काळात प्राजक्ता माळी या अत्यंत प्रांजळपणे, कोणाचीही भीडभाड न बाळगता आपल्या बावनकशी बुद्धीच्या जोरावर ज्या हिमतीने पत्रकारांच्या समोर आल्या आणि आपली बाजू मांडून आपल्याला काय क्लेश झाले आहेत, ते सांगितले, त्याबद्दल प्राजक्ता निश्चितच अभिनंदनास पात्र आहे.
काय होणार खूनप्रकरणाचे ?
बीड जिल्ह्यातील खून प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे. त्यातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि त्याचे साथीदार फरारी आहेत. हे सर्वजण मंत्री धनंजय मुंडे यांचे साथीदार आहे आणि सर्व प्रकरण आता फडणवीस यांच्या कोर्टात आहे. आपला रामशास्त्री बाणा ते कसे जपतात आणि प्राजक्ता माळी तसेच या खून प्रकरणाला न्याय देतात, हे पाहणे उचित ठरणार आहे !