काळी, पांढरी आणि पिवळ्या बुरशीनंतर आता देशात हिरव्या बुरशीचा पहिला रूग्ण
![After black, white and yellow fungus, now the first patient of green fungus in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Corona-4-.jpg)
नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. परंतू, आता कोरोनोत्तर रोग वाढत आहेत. त्यातच आता देशभरात काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. योग्य खबरदारी घेतली तर याही रोगावर आपण मात करू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण आता काळी, पांढरी आणि पिवळी बुरशीनंतर देशात हिरव्या बुरशीचा पहिला रूग्ण सापडला आहे.
मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका रुग्णाला हिरव्या बुरशीची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या 34 वर्षीय रुग्णाला उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सनेज मुंबईत आणण्यात आलं आहे. मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं आहे. म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्याचा संशय आल्यानं रूग्णाने स्वतःहून दवाखान्यात तपासणी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
रूग्णाने चाचणी केली असता फुफ्फुस, रक्तात हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये असणारा हिरवी बुरशी संसर्गाचा प्रकार इतर रुग्णांच्या तुलनेत वेगळा आहे का यावर संशोधनाची गरज असल्याचं डॉक्टर रवी दोशी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याची ही देशातील पहिलीच केस आहे. अॅम्फोटेरेसिन हे इंजेक्शन म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे. रेमडेसिविरसारखा काळाबाजार या इंजेक्शनच्या बाबतीत होऊ नये, यासाठी आरोग्य प्रशासनाने स्वतंत्र नियमावली बनवून या इंजेक्शनच्या पुरवठ्या संदर्भात माहिती जाहीर केली आहे.