कुडाळच्या शाळेत चिमुकल्यांना अभिनयाचे धडे
अभिनेत्री नयना आपटेंकडून विद्यार्थ्यांसाठी भन्नाट विनोदी अभिनय कार्यशाळा- नाटकांत काम करण्याचीही दिली संधी

कुडाळ | ग्रामिण भागात अभिनय कार्यशाळेच्या माध्यमातून चिमुकल्यांमधील अभिनय कौशल्य, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे अभिनय क्षेत्रातील उद्याचे उत्तम व हाडाचे कलाकार निर्माण करण्यासारखे आहे, अभिनय म्हणजे फक्त संवाद नव्हे, तर भाव, देहबोली आणि आत्मविश्वास यांचा सुंदर संगम आहे, हे मुलांना अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने यानिमित्ताने शिकवता आले, मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांना व्यक्त व्हायला शिकवणे हेच खरे कार्यशाळेचे उद्दिष्ठ असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्री नयना आपटे यांनी बोलताना व्यक्त केले.
कुडाळ ता. जावळी येथील पीएम श्री जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळेत माता अनुसया प्रोडक्शनचे दिग्दर्शक प्रवीण कुमार भारदे व अभिनेत्री नयना आपटे यांनी शाळेला सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी भन्नाट विनोदी अभिनय कार्यशाळा आयोजित केली होती.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आवाज, संवाद कौशल्ये आणि अभिनयाच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच मुलांना रंगमंचावरील शिस्त, सादरीकरणाची ताकद आणि विनोदातून व्यक्त होण्याची कला शिकवली. यावेळी खळखळून हसत- खेळत मुलांनी अभिनयाचे धडे घेतले.
हेही वाचा : विश्वविजेत्या भारतीय संघावर पैशांचा वर्षाव! विजेता-उपविजेत्या संघाला किती बक्षीस?
यावेळी बोलताना दिग्दर्शक प्रवीण भारदे म्हणाले, या कार्यशाळेतून विद्यार्थांचा आत्मविश्वास वाढवून रंगमंचावरील भीती घालवणे हा मुख्य हेतू होता, तसेच भावभिनय, आवाज काढणे, संवाद फेक, गाणी आणि छोट्या नाटिका ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला चालना मिळते. भावभिनय व संवाद यांमुळे मुलांचे भावनिक बुद्ध्यांक वाढवण्यासाठी अभिनयाचा वापर केला जातो, कार्यशाळेच्या शेवटी सहभागी झालेल्या सर्व मुलांसाठी त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण व मुक्त नृत्य घेण्यात आले यावेळी शाळेच्या वतीने दोन्ही प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक सचिन पवार यांनी यावेळी प्रास्ताविक केले तर सैा.अंजली गोडसे यांनी आभार मानले.
अनं…शाळेचा प्रत्येक कोपरा हास्याने, टाळ्यांच्या गजराने आणि उर्जेने भारावून गेला खरं तर विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा नव्हतीच तो तर आनंदाचा उत्सव होता, मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य, त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि अभिनयातील सहजता हे सर्व पाहताना मन अभिमानाने भरून आल्याचे शिक्षक व पालकांनी सांगितले.
आज यानिमित्ताने शाळेचा प्रत्येक कोपरा हास्याने, टाळ्यांच्या गजराने आणि सर्जनशीलतेच्या उर्जेने भारावून गेला होता, अभिनय शिकताना मुलांनी फक्त हसणं शिकलं नाही, तर आत्मविश्वासाने जगण्याची कला देखील शिकल्याचे पहावयास मिळाले. या कार्यशाळेतून कुडाळ शाळेतील विद्यार्थीनी कु.दुर्वा पाटील हिला काँमेडीची चेटकीण व मला आई बाबा हवेत या दोन नाटकाच्या प्रयोगात अभिनय करण्याची संधी आयेजकांकडून देण्यात आली.





